कोल्हापूर : भवानी मंडप येथील शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीचे भूमिगत मजला, तळ मजला, स्टील्ट पहिला मजला तातडीने ताब्यात घेऊन तिथे अंबाबाईसाठी येणाऱ्या भाविकांची दर्शन रांगेसह इतर सुविधा कराव्यात असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला दिले आहेत. या जागेबाबत संघ व ‘मॅग्नेट’ बझार यांच्यातील वाद न्यायालयात असताना जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आपत्ती कायद्यातंर्गत घेतलेल्या भूमिकेने संघाचे व्यवस्थापन अडचणीत आले आहे. जागा ताब्यात देण्यास विरोध केला तर थेट कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात रोज दीड लाख भाविक येतात. सध्या मंदिराबाहेर तात्पुरता मंडप घालून दर्शन रांग उभी करावी लागते. मंदीर परिसरातील मोकळा परिसर व्यापला जातो. या दरम्यान काही अनूचित घटना घडल्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने परिसर मोकळा असणे गरजेचे आहे. संघाच्या तीन मजल्यावर दर्शन मंडप, स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष, प्राथमिक उपचार केंद्र, इतर आवश्यक सुविधा भाविकांना द्यायच्या आहेत. त्यामुळे ऐतिहासिक भवानी मंडपासह परिसर खुला राहणार असल्याचे देवस्थान समितीचे म्हणणे आहे. ते योग्य असून संघाने ही जागा तात्काळ देवस्थान समितीला मोकळी करुन द्यावी. असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.
Kolhapur- शेतकरी संघ इमारतीचे तीन मजले ताब्यात घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By राजाराम लोंढे | Updated: September 23, 2023 17:18 IST