कोल्हापूर : प्राधान्य गटातील शिधापत्रिकेसाठी करवीर तहसील कार्यालयाचे उत्पन्नाचे बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या २७ जणांना बुधवारी कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण कार्यालयाने नोटिसा पाठवल्या आहेत. हे बोगस दाखले आपल्याकडे कसे आले, कुठल्या यंत्रणेने काढून दिले याबाबत खुलासा मागितला आहे. पुढील आठ दिवसांत या प्रकरणांची चौकशी करून कारवाई केली जाणार आहे.प्राधान्य गटातील शिधापत्रिका काढून मिळावी यासाठी २७ जणांनी पुरवठा कार्यालयाकडे कागदपत्रे सादर केली होती. त्यांची पडताळणी सुरू असताना त्यातील उत्पन्नाचे दाखले बोगस असल्याची शंका अधिकाऱ्यांना आली. त्यांनी हे दाखले करवीर तहसील कार्यालयाला पाठवून आपल्याकडून वितरित केले गेले आहेत का, याची चौकशी केली. मात्र तहसील कार्यालयाने यातील एकही दाखला दिला नसल्याचे सांगितल्याने हे दाखले बोगस असण्यावर शिक्कामोर्तब झाले. पुरवठा विभागाने तसे लेखी पत्र तहसील कार्यालयाकडून घेतले.
आज बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकारी माेहिनी चव्हाण यांनी शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सचिन काळे यांना दाखले सादर केलेल्या सर्व नागरिकांना नोटिसा काढून खुलासे मागविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांना नोटिसा काढून ४८ तासांत त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. ज्यांचे खुलासे येणार नाहीत त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे.
बोगस दाखले दिले कुणी?कार्यालयीन कर्मचारी ऑफिस लॉगइन वापरतात. महा ई-सेवा केंद्रांकडून पब्लिक लॉगइन वापरले जाते. केंद्राकडून उत्पन्नाच्या दाखल्यासाठीचा अर्ज करवीर तहसील कार्यालयाकडे जातो. तहसीलदारांची बोगस सही करून दाखले कुणी दिले याची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे महा ई-सेवा केंद्र चालक व कार्यालयीन कर्मचारीदेखील चौकशीच्या भोवऱ्यात येणार आहेत.