सचिन यादवकोल्हापूर : कोल्हापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात युवती, महिलांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर आहे. सुरक्षेसाठी कोणीच वाली नसल्याचे चित्र गुरुवारी सीबीएसमध्ये पाहायला मिळाले. स्थानकात पोलिसांसाठी असलेल्या टेहळणी कक्षात पोलिस नसल्याचे आढळून आले, तर त्यांच्या मदतीला चार दिवसांपूर्वीच दिलेले दोन होमगार्डही मोबाइलवर बोलण्यात व्यस्त होते. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजताचे हे चित्र आहे. एसटी महामंडळाला ९० कोटींहून अधिक उत्पन्न मिळवून देऊन ४ कोटी, ५२ लाख २५ हजार ८२६ महिलांनी प्रवास केला आहे.पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या बसस्थानकात युवती, महिला आणि ज्येष्ठ महिलांची सुरक्षा किती आहे, याची पाहणी लोकमतने केली.कोल्हापूरच्या बसस्थानकात बारा आगारातून आणि परजिल्ह्यातील आगाराच्या एसटीची वाहतूक दिवस-रात्र सुरू असते. दररोज सरासरी ५० हजारांहून अधिक प्रवासी विविध मार्गांवर प्रवास करतात. महिलांसाठी मोफत एसटी प्रवास योजना सुरू असल्याने प्रवासात महिलांचा टक्का वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून कोल्हापूर बसस्थानकात मोठ्या संख्येने महिला प्रवासी येतात. त्या तुलनेत बसस्थानकात कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नाहीत. रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य असते. बसस्थानक परिसरात अनेकदा माथेफिरू, दारुडे बसलेले असतात.
सुमारे साडेचार कोटी महिलांचा प्रवाससन २०२३-२४मध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीतून ३ कोटी ३५ लाख २१ हजार ४०५ महिलांनी प्रवास केला. सन २०२४-२५ या वर्षात (जानेवारीअखेर) ४ कोटी ५२ लाख २५ हजार ८२६ महिलांनी प्रवास केला आहे. त्यातून एसटीला ९० कोटी १७ लाख ५३ हजार ९९८ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्या तुलनेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
तिन्ही घटक जबाबदारप्रवाशांच्या बॅगा चोरणे, पाकीट मारणे, महिलांच्या गळ्यातील सोने हिसकावून नेणे, बिस्कीट देऊन प्रवाशांला बेशुद्ध करून सोने - चांदीचे दागिने, साहित्य लंपास केले आहेत. बसमध्ये चढताना युवतींची छेड काढल्याचे प्रकार घडले आहेत. चोरीच्या घटना रोखण्यास असमर्थ असलेल्या एसटीचे प्रशासन, पेट्रोलिंगसाठी असलेले पोलिस आणि एसटीकडून नियुक्त केलेले मास्कोचे कर्मचारीही तितकेच जबाबदार आहेत.
हिरकणी कक्ष बंदमाता - बालकांसाठी बसस्थानकात असलेला हिरकणी कक्ष बंद आहे. नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने हा कक्ष बंद केल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, या कक्षाची पर्यायी सक्षम व्यवस्था केलेली नसल्याने माता - बालकांची गैरसोय होत आहे.