कोल्हापूर : अस्स्लपणा हे महर्षी शिंदे यांच्या साहित्याचे गुणवैशिष्ट्य : गोपाळ गुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 05:57 PM2019-01-02T17:57:07+5:302019-01-02T17:59:56+5:30
अनुभवशील चिंतनातून संशोधनपर लेखनामध्ये झळकणारा अस्सलपणा हे महर्षी वि.रा. शिंदे यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामुळेच भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची अत्यंत मूलभूत, वस्तुनिष्ठ मांडणी त्यांना करता आली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू यांनी बुधवारी येथे केले.
कोल्हापूर : अनुभवशील चिंतनातून संशोधनपर लेखनामध्ये झळकणारा अस्सलपणा हे महर्षी वि.रा. शिंदे यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामुळेच भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची अत्यंत मूलभूत, वस्तुनिष्ठ मांडणी त्यांना करता आली, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू यांनी बुधवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन आणि एन. डी. पाटील प्रतिष्ठानच्यावतीने महर्षी शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न: संशोधन व कार्य’असा चर्चासत्राचा विषय होता.
अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, तर ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील, माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले प्रमुख उपस्थित होते.
डॉ. गुरू म्हणाले, महर्षी शिंदे यांची त्यांच्या हयातीत आणि त्याउपरांतही मोठी सामाजिक उपेक्षा झाली. आत्मटीका हा सुद्धा महर्षींच्या लेखनाचा गुणधर्म होता. या आत्मटिकेचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पानोपानी आढळते. ती सुद्धा त्यांच्या उपेक्षेला कारण ठरली. मात्र, त्याची तमा न बाळगता महर्षी आपण अंगिकारलेले कार्य व्रतस्थ भावनेने करीत राहिले. हेच त्यांचे सर्वात महत्त्वाचे वेगळेपण आहे.
ज्येष्ठ विचारवंत डॉ. पाटील म्हणाले, महर्षी शिंदे हे एक क्रांतीकारक समाजसुधारक होते. आपली संपूर्ण हयात त्यांनी अस्पृश्यता निवारणासारख्या मूलभूत प्रश्नासाठी वेचली आणि आपल्या कार्याने साऱ्या महाराष्ट्राची मान उंचावली. महाराष्ट्राने मात्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा फारसा गांभिर्याने विचार केला नाही. तरीही अस्पृश्योद्धाराचे कार्य सर्व तऱ्हेची उपेक्षा सोसून ते करीत राहिले. एकट्यानेच नव्हे, तर साऱ्या कुटुंबियांना सोबत घेऊन त्यांनी हे काम केले, हे त्यांच्या कार्याचे तत्कालीन समाज परिस्थितीत फार झळाळून उठून दिसणारे वैशिष्ट्य आहे.
डॉ. भारती पाटील म्हणाल्या, अस्पृश्यतेच्या प्रश्नाची मूलभूत मांडणी करण्याबरोबरच त्याला सांख्यिकीय मांडणीची जोड देऊन या प्रश्नाचे गांभीर्य देशाला पटवून देण्याचे काम महर्षी शिंदे यांनी देशात सर्वप्रथम केले. त्यांचे हे पुस्तक म्हणजे एक अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख उपस्थितांच्या हस्ते महर्षी शिंदे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्य वाङ्मय पुरस्कार प्राप्त करणारे ज्येष्ठ इतिहासतज्ञ डॉ. जयसिंगराव पवार, साहित्यिक कृष्णात खोत यांचा डॉ. गुरू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस, अशोक चौसाळकर, टी. एस. पाटील, भारत पाटणकर, गेल आॅम्वेट, रत्नाकर पंडित, जगन कराडे, व्यंकाप्पा भोसले, अरुण शिंदे, अवनीश पाटील, मेधा पानसरे, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, रफिक सूरज, सुरेश शिपूरकर, आदी उपस्थित होते. अध्यासनाचे प्रमुख रणधीर शिंदे यांनी स्वागत केले. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.