कोल्हापूर : पदवीला फक्त लग्नाच्या बाजारात किंंमत आहे. त्यामुळे नुसते कॉलेज करून उपयोगाचे नाही, तर त्यासोबत नॉलेजही महत्त्वाचे आहे, असे सांगून ‘आयटी इंडस्ट्रीजमध्ये करिअर करायला चांगली संधी आहे. परंतु त्यासाठी ज्ञान, चांगले गुण, कौशल्य विकास, उत्कृष्ट कामगिरी, अथक मेहनत व वेळेचे नियोजन हे सूत्र अंगिकारावे लागेल, असा मूलमंत्र संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी आज, शनिवारी येथे विद्यार्थ्यांना दिला. शिकारपूर यांचे विचार ऐकून घेण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थी-पालकांनी सभागृह तुडूंब भरले होते.कदमवाडी येथील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटमध्ये लोकमत युवा नेक्स्ट, भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट आणि रोटरी क्लब आॅफ हेरिटेज यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयटी इंडस्ट्रीजमधील करिअर संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख उपस्थिती ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. नितीन नायक, रोटरी क्लब आॅफ हेरिटेजचे सचिन पोरे, गौरी शिकारपूर, मिलिंद करमरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.शिकारपूर म्हणाले, करिअर करताना आपली गुंतवणूक महत्त्वाची आहे. ही गुंतवणूक मेहनतशील व अभ्यासू असावी. ‘आयटी इंडस्ट्री’ हे रिझल्ट देणारे क्षेत्र आहे. या ठिकाणी करिअर करण्याची मोठी संधी आहे. पुण्यासह देश-विदेशातही अनेक संधी उपलब्ध आहेत. परंतु त्यासाठी कौशल्य विकास, उत्कृष्ट कामगिरी, अथक मेहनत व वेळेचे नियोजन या गोष्टींची गरज आहे. सध्याचा जमाना हा सोशल मीडियाचा ट्रेंड आला आहे. स्मार्ट फोन हा तर जणू लोकांच्या गळ्यातील ताईतच बनला आहे. त्यामुळे या क्षेत्राकडे पाहताना नोकरीची अचूक संधी म्हणून पाहिले तरी वावगे होणार नाही. यातील धोकेही लक्षात घेतले पाहिजेत. सायबर क्राईमही तितक्याच वेगाने फोफावत आहे. त्यामुळे ‘आयटी’ची सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची आहे. जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांना वर्षभर नाही, पण परीक्षेच्या आधी १५ दिवस अभ्यास करण्याची संस्कृती आहे. या काळातील वातावरण हे परीक्षेच्या अभ्यासाने अभ्यासमय झालेले असते. या काळातील घोकमपट्टी, पाठांतर विद्यार्थी नंतर विसरतात. परंतु ‘आयटी’मध्ये करिअर करताना असे करून चालणार नाही. डॉ. नितीन नायक यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एस. एस. गुळवणी यांनी करून दिला.
‘कॉलेज’बरोबर नॉलेज’ही हवे : शिकारपूर
By admin | Updated: July 13, 2014 00:47 IST