कोल्हापूर : राज्यातील बालवाडी शिक्षिका व सेविकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने शिक्षिका व पोलिसांत धक्काबुक्की झाली. या घटनेचा बालवाडी सेविका व शिक्षिका यांच्यावतीने निषेध करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी कोल्हापुरात आले होते. शाहू सांस्कृतिक भवन येथे बाहेर जिल्ह्यातील पूर्वप्राथमिक शिक्षिका व सेविका मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी थांबल्या होत्या. पण मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पूर्वपरवानगी घेतली नसल्याने पोलिसांनी निवेदन देण्यास परवानगी दिली नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रम संपवून बाहेर येत असताना शिक्षिका व सेविकांनी एकच गोंधळ सुरू केला, त्यांच्या गाडीकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस व त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर पूर्वप्राथमिक शिक्षिका व सेविका महासंघाच्यावतीने शासनाचा निषेध केला. पोलिसांनी शिक्षिकांना अटक करून शाहूपुरी पोलिसांत आणून सुटका केली. यावेळी बोलताना महासंघाच्या राज्य कार्याध्यक्षा प्राची कुलकर्णी म्हणाल्या, बालवाड्यांना शासन अनुदान मिळावे, शिक्षिका व सेविकांना शासनाकडून पगार मिळावा, आदी मागण्या अनेक वर्षे करत आहे. पण शासन दुर्लक्ष करत आहे. आज, मुख्यमंत्र्यांपर्यत भावना पोहोचवण्याचा प्रयत्न होता. त्याला पोलिसांनी विरोध केल्याने आम्ही निषेध केला. त्यामध्ये राज्याध्यक्षा सुचेता कलाजे, नीशा दंडगे, स्मिता सुतार आदी सहभागी होत्या. (प्रतिनिधी)
बालवाडी शिक्षिका, पोलिस धक्काबुक्की
By admin | Updated: August 3, 2014 23:33 IST