कळे वार्ताहर -( दि. १३)
कळे बीड ( ता करवीर ) येथील आनंदा बापू कांबळे ( वय-४९) यांचे जबरदस्तीने अपहरण करून त्यांना जातीवाचक शिवीगाळ व बेदम माराहण करून जखमी केल्याप्रकरणी ६ जणांवर ॲट्रॉसिटी दाखल करण्यात आली. सर्व संशयित आरोपींना कळे पोलिसांकडून १२ तासांच्या आत अटक करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे - आनंदा कांबळे यांचा मुलगा किशोर कांबळे याने आंतरजातीय विवाह केल्याच्या राग मनात धरून व मुलीला परत ताब्यात देण्यासाठी व सदरचे प्रकरण मिटवण्यासाठी आनंदा कांबळे यांना चिव्याच्या काठीने व लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करून संशयित आरोपींनी जखमी अवस्थेत करवीर पोलीस स्टेशनजवळ सोडून दिले व घडलेला प्रकार कोणालाही सांगू नये यासाठी जीवे मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित आरोपी - १) बाजीराव बाबूराव यादव (४८) रा. कळे बीड (ता. करवीर) २) अमोल रंगराव पाटील (२८) रा. कोतोली (ता. पन्हाळा), ३) विनय श्रीपती सावंत (३८) रा. गारगोटी (ता. भुदरगड) ४) अक्षय अनिल सावंत (२१) रा. गारगोटी (ता. भुदरगड), ५) उमेश श्रीपती सावंत (३५) रा. कोलोली (ता. पन्हाळा), ६) अजित दिनकर पाटील (२७) रा. कोलोली (ता. पन्हाळा)
जखमी आनंदा कांबळे यांच्यावर डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर या ठिकाणी उपचार सुरू आहेत.