कोल्हापूर : के. एस. ए. लीग फुटबॉल सामन्यात आज, गुरुवारी खंडोबा तालीम मंडळाने तुल्यबळ दिलबहार तालीम मंडळ (अ)वर २-१ अशी मात केली; तर दुसऱ्या सामन्यात अनुभवी संध्यामठ तरुण मंडळाने नवख्या पॅॅट्रियट स्पोर्टसवर ३-० अशी एकतर्फी मात केली.छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या के. एस. ए. लीग फुटबॉल स्पर्धेत दुपारच्या सत्रात पहिला सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ (अ) यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळाचे प्रदर्शन केले. २० व्या मिनिटाला खंडोबाच्या श्रीधर परबने मैदानी गोल करीत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. ती कमी करण्यासाठी ‘दिलबहार’कडून सनी सणगर, सचिन पाटील, जावेद जमादार, करण चव्हाण, नीलेश जाधव यांनी जंग जंग पछाडले. सचिन पाटीलच्या पासवर सनी सणगरने गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या.‘दिलबहार’कडून सामन्यात बरोबरी आणण्यासाठी ‘खंडोबा’च्या गोलक्षेत्रात अनेक खोलवर चढाया करण्यात आल्या. मात्र, ‘खंडोबा’च्या गोलरक्षकाने त्या परतावून लावल्या. खंडोबाकडून शकील पटेल, कपिल साठे, चंद्रशेखर डोका, सचिन बारामती, सुमित जाधव, विकी सुतार, विकी शिंदे, शशांक अश्वेकर यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ४३व्या मिनिटास ‘दिलबहार’च्या सचिन पाटीलने दिलेल्या पासवर सनी सणगरने गोल नोंदवीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. बरोबरीनंतर सामना अटीतटीचा झाला. दोन्ही संघांकडून एकमेकांच्या गोलक्षेत्रात अनेकवेळा गोल करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, सजग गोलरक्षकांनी ते परतावून लावले. ५२ व्या मिनिटास ‘खंडोबा’कडून चंद्रशेखर डोका याने आलेल्या संधीवर गोल करीत आपल्या संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. अखेरपर्यंत ‘दिलबहार’कडून सामन्यात बरोबरी साधण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ‘खंडोबा’च्या भक्कम बचावफळीपुढे काहीच चालले नाही. अखेर तुल्यबळ दिलबहार तालीम मंडळास २-१ अशी हार पत्करावी लागली. दुसरा सामना संध्यामठ विरुद्ध पॅट्रियट स्पोर्टस यांच्यात झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच नवख्या पॅट्रियट स्पोर्टसवर ‘संध्यामठ’चा दबाव होता. सामन्याच्या ३६ व्या मिनिटाला ओंकार सूर्यवंशीने अक्षय पाटीलच्या पासवर पहिल्या गोलची नोंद करीत १-० अशी आघाडी मिळविली. ‘पॅट्रियट’कडून गोल फेडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र, अनुभवी ‘संध्यामठ’पुढे काहीच चालले नाही. पुन्हा ६५ व्या मिनिटाला निखिल जाधवने अभिजित सुतारच्या पासवर गोलची नोंद करीत २-० अशी आघाडी मिळवून दिली. ‘पॅट्रियट’कडून नीलेश मस्कर, राहुल देसाई, महेंद्र चव्हाण, किसन ठाणेकर, रजत शेटे, मुकेश धुबे, सय्यद मोईनुद्दीन यांनी चांगला खेळ केला. मात्र, अनुभवी ‘संध्यामठ’च्या खेळाडूंसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. ‘संध्यामठ’कडून सिद्धार्थ कुराडे, सिद्धेश यादव, ओंकार सूर्यवंशी यांनी चांगला खेळ केला. ७० व्या मिनिटास पुन्हा निखिल जाधवने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदविला. अखेरपर्यंत सामन्यात बरोबरी करण्यासाठी पॅट्रियट संघाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, ‘संध्यामठ’च्या व्यूहरचनेपुढे त्यांचा निभाव लागला नाही. अखेर ‘संध्यामठ’ने हा सामना ३-० असा जिंकला. (क्रीडा प्रतिनिधी)
‘खंडोबा’ची ‘दिलबहार’वर मात
By admin | Updated: November 28, 2014 00:33 IST