केरळात डाव्या पक्षांना सोने महागात पडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:25 AM2021-03-09T04:25:23+5:302021-03-09T04:25:23+5:30

तिरुवनंतपुरम : कोरोना काळात सर्वाधिक चांगले काम केल्याने केरळातील डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारची प्रतिमा देशभर उजळून निघाली ...

In Kerala, gold will be more expensive for the Left | केरळात डाव्या पक्षांना सोने महागात पडणार

केरळात डाव्या पक्षांना सोने महागात पडणार

Next

तिरुवनंतपुरम : कोरोना काळात सर्वाधिक चांगले काम केल्याने केरळातील डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखालील एलडीएफ सरकारची प्रतिमा देशभर उजळून निघाली खरी. मात्र, गतवर्षी केरळमध्ये झालेल्या सोने तस्करीचे भूत ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डाव्या पक्षांच्या मानगुटीवर बसल्याने डाव्या पक्षांची पुरती कोंडी झाली आहे. खुद्द मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांची नावे सोने तस्करी प्रकरणात अडकल्याने विरोधकांनी डाव्यांविरोधात रान उठविले आहे. त्यामुळे केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांनी उकरून काढलेले सोनं डाव्यांना महागात पडते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळल्यानंतर तेथे मोठ्या संसर्गाची भीती व्यक्त झाली होती. मात्र, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या मंत्रिमंडळाने कोरोनाकाळात सर्वाधिक चांगल्या उपाययोजना करीत कोरोनाला रोखण्यात यश मिळविले होते. विशेषत: आरोग्यमंत्री के. शैलजा यांच्या कामाची तर जगभर स्तुती झाली होती. ६० लाख नागरिकांना प्रत्येकी १६०० रुपये पेन्शन, ८० लाख कुटुंबांना धान्य कीट, तर कोरोना रुग्णावर मोफत उपचार यासारख्या अनेक सुविधा देऊन केरळमधील एलडीएफ सरकारने आपली प्रतिमा उंचावली आहे. कोरोनाकाळातील हेच काम घेऊन एलडीएफ सरकार विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. त्यासाठी राज्यभर कॅम्पेनही चालविले जात आहे. मात्र, सोने तस्करीचा मुद्दा ऐन निवडणुकीच्या तोंडावरच विरोधकांनी उकरून काढल्याने एलडीएफ सरकार आरोपांच्या पिंजऱ्यात घेरले आहे.

शबरीमाला नव्हे...सोन्यावर बोला

शबरीमाला मंदिराच्या प्रवेशावरुन केरळमध्ये डावे पक्ष आणि भाजपमध्ये सातत्याने वादाच्या ठिणग्या पडत असतात. लोकसभा निवडणुकीत तर भाजपने शबरीमाला मंदिराचा मुद्दा घेऊन राज्यभर डाव्यांविरोधात संघर्ष केला. यात हिंदुच्या मतांमध्ये ध्रुवीकरण करण्यातही भाजप काही प्रमाणात यशस्वी ठरला. विधानसभा निवडणुकीत मात्र, भाजपने

शबरीमालापेक्षाही सोने तस्करीचा मुद्दा अधिक आक्रमकपणे उचलत डाव्यांना खिंडीत गाठले आहे. यासाठी भाजपला केंद्राकडूनही रसद दिली जात असल्याने भाजपने सोनेतस्करीच प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवली आहे.

...तरीही मिळवला होता डाव्यांनी विजय

सोने तस्करीची घटना ही ५ जुलै २०२० रोजी घडली होती. त्यानंतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीने घवघवीत यश मिळवले होते. ५ पैकी ४ महानगरपालिका तर १५० पैकी १०८ पंचायत समित्यांवर डाव्यांनी झेंडा फडकविला होता. मात्र, त्यावेळच्या निवडणुकांवेळी या प्रकरणात डाव्या पक्षांचे नाव थेट नसल्याने त्याचा परिणाम निकालात दिसला नाही. आता मात्र, सोने तस्करीचा मुद्दा थेट डाव्यांभोवतीच फिरू लागल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण : ५ जुलै २०२० रोजी येथील त्रिवेंद्रम विमानतळावर ३० किलो सोने शौचालयासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तुंमध्ये आढळले होते. यामध्ये स्वप्ना सुरेश या महिलेला अटक करण्यात आली होती. संबंधित महिला डाव्या लोकशाही आघाडीची निकटवर्तीय असल्याचा आरोप सातत्याने होत होता. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेने या सोने तस्करीमध्ये थेट मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह तीन मंत्र्यांची नावे घेतल्याने एलडीएफ सरकार अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे याच सोने तस्करीच्या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांनाही पदावरून पायउतार व्हावं लागले आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून या तस्करीचे रॅकेट चालिवल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे.

Web Title: In Kerala, gold will be more expensive for the Left

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.