कोल्हापूर : न्याय व विधी खात्याचे राज्यमंत्री रणजित पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कामकाजाची शुक्रवारी माहिती घेतली. यावेळी त्यांनी समितीच्या अखत्यारित असलेल्या सर्व संपत्तीचे रेकॉर्ड अद्ययावत पद्धतीने केले जावे, अशा सूचना केल्या. देवस्थान समितीच्या बलभीम बँक येथील मुख्य कार्यालयात ही बैठक झाली.यावेळी पाटील यांनी देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेली मंदिरे, जमिनी, देवतांचे दागिने, ठेवी, खर्च यासंबंधीची माहिती घेतली. देवस्थानच्यावतीने सचिव व सदस्यांनी गेल्या काही महिन्यांपासून जमिनींच्या नोंदीचे काम सुरू असून, पन्हाळा व शाहूवाडीवगळता अन्य जिल्हे व तालुक्यांतील जमिनींच्या नोंदी झाल्याचे सांगितले. अंबाबाई मंदिर, वाडी रत्नागिरी येथील जोतिबा मंदिर, कोल्हापूर परिसरातील देवस्थानांमध्ये असलेल्या दागिन्यांचे मूल्यांकन पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, शासकीय संस्था असल्याने नागरिक देवस्थानसंबंधीची माहिती विचारू शकतात. त्यावेळी देवस्थानकडे सर्व नोंदी उपलब्ध असणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)
देवस्थानच्या सर्व संपत्तीच्या नोंदी ठेवा
By admin | Updated: May 23, 2015 00:26 IST