कोल्हापूर : जनतेच्या प्रश्नांशी देणे-घेणे नसलेल्या व सतत गैरहजर राहणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दशरथ कोठुळे यांच्या कार्यालयाला बुधवारी (दि. १३) टाळे ठोकूून त्यांना जाब विचारण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय सीपीआर बचाव कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सर्वांनीच छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर)चे प्रलंबित प्रश्न, शासनाचा निधीसाठी लागणारा विलंब या कारणांवरून प्रशासकीय कारभाराबद्दल तोफ डागली. समितीचे निमंत्रक वसंत मुळीक अध्यक्षस्थानी होते. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथील सभागृहात ही बैठक झाली. वसंत मुळीक यांनी गतवर्षीचा ‘सीपीआर’च्या कारभार व निधीबाबत पाढा वाचला. ते म्हणाले, सीटी स्कॅनसाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला; पण प्रशासकीय अनास्थेमुळे हा निधी परत गेला. तथापि, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक प्रवीण ह. शिणगारे यांनी १५ दिवसांपूर्वी कोल्हापुरात भेटीवेळी २०१४-१५ या आर्थिक वर्षाच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये या निधीची तरतूद अंदाजपत्रकात (बजेट) केलेली आहे. कोणत्याही स्थितीत हा निधी परत जाणार नाही. तो पुढे वापरता येतो, असे शिणगारे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ‘सीपीआर’मध्ये १३ पैकी ११ व्हेंटिलेटर बंद स्थितीत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यावेळी बहुतेक नेत्यांनी आंदोलन तीव्र करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी भगवान काटे, सोमनाथ घोडेराव, किशोर घाटगे, बबन सावंत, चंद्रकांत बराले, शिरीष देशपांडे, आदींनी मते व्यक्त केली. बैठकीस काशिनाथ गिरीबुवा, रूपा वायदंडे, बबन सावंत, महादेव पाटील, शिवाजी ससे, अवधूत पाटील, संदीप पाटील, अमोल माने, शिरीष जाधव, भाऊसाहेब काळे उपस्थित होते.
कोठुळेंच्या दालनाला बुधवारी टाळे
By admin | Updated: May 10, 2015 01:01 IST