कुंभोज : येथील होळकर ग्रुप तसेच श्री बिरदेव कला, क्रीडा मंडळ यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय निमंत्रित कबड्डी स्पर्धेत कौलव (ता. राधानगरी) येथील शिवमुद्रा कला, क्रीडा संघाने विजेतेपद मिळवले. शिरोली (ता. हातकणंगले) येथील सर्व्हेश्वर कबड्डी संघाने उपविजेतेपद तर शिवप्रेमी कबड्डी संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झालेल्या सर्व साखळी सामन्यांत जिल्ह्यातून चोवीस संघ सहभागी झाले होते. सर्वच सामन्यांना कुंभोज पंचक्रोशीतील कबड्डी प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेतील विजेत्या संघांना नूतन सरपंच माधुरी घोदे, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते अनुक्रमे दहा हजार, सात हजार व पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस तसेच पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सुधीर हुजरे, श्रीराम खवरे, अतुल राजपूत या खेळाडूंना वैयक्तिक उत्कृष्ट खेळाबद्दल रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी संदीप लवटे तसेच सहकाऱ्यांनी पंच म्हणून काम पाहिले.