कृष्णाकाठचे कार्ल मार्क्स

By वसंत भोसले | Published: November 7, 2019 12:48 AM2019-11-07T00:48:53+5:302019-11-07T00:50:17+5:30

महाराष्ट्राचे ज्येष्ठ विचारवंत, माजी मंत्री यशवंतराव मोहिते ऊर्फ भाऊ यांचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून (दि. ७) सुरू होत आहे. त्यानिमित्ताने खास लेख

 Karl Marx of Krishnakath | कृष्णाकाठचे कार्ल मार्क्स

कृष्णाकाठचे कार्ल मार्क्स

Next
ठळक मुद्दे सन १९५२ ते १९८० असा अठ्ठावीस वर्षांचा विधिमंडळाचा त्यांचा प्रवास आहे. त्यापैकी सलग अठरा वर्षे उपमंत्री ते कॅबिनेट मंत्री म्हणून कार्य केले आहे

- वसंत भोसले-

देशाची राजकीय परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे. या बदलत्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला प्रभावीपणे काम करता यावे यासाठी कॉँग्रेस संघटनेची डागडुजी करण्याची गरज आज भासू लागली आहे. कॉँग्रेसला ११४ वर्षांची परंपरा आहे. आपली ही संघटना स्वतंत्र भारताची शिल्पकार आहे आणि तिचा आपणा सर्वांना सार्थ अभिमान आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या गरजेप्रमाणे ती अनेकवेळा बदलत गेली आहे.’

महाबळेश्वरमध्ये सन १९९९ मध्ये प्रदेश कॉँग्रेस पक्षाचे अधिवेशन होते. त्यामध्ये ‘कॉँग्रेसचा इतिहास आणि परंपरा’ हा विषय घेऊन ज्येष्ठ विचारवंत, कॉँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री यशवंतराव मोहिते यांनी हे विचार मांडले होते. कॉँग्रेसची आजची अवस्था पाहता त्यांनी मांडलेले विचार आणि मोजक्या शब्दांत वरीलप्रमाणे केलेले वर्णन किती समर्पक होते, याची प्रचिती येते. यासाठीच त्यांना केवळ ‘कॉँग्रेसचे नेते’ म्हणून चालणार नाही, ते एक ज्येष्ठ विचारवंतच होते. त्यांनी घेतलेल्या भूमिका या भावनिक नव्हत्या, त्या एका वैचारिक मंथनानंतर तयार झालेल्या होत्या. वयाच्या बत्तीसाव्या वर्षी आमदार झाल्यावर महाराष्ट्रासमोरील प्रश्नांची उकल करत त्यांनी राजकारण केले आहे. सन १९५२ ते १९८० असा अठ्ठावीस वर्षांचा विधिमंडळाचा त्यांचा प्रवास आहे. त्यापैकी सलग अठरा वर्षे उपमंत्री ते कॅबिनेट मंत्री म्हणून कार्य केले आहे.

कृष्णाकाठच्या रेठरे बुद्रुक गावाच्या सधन मोहिते घराण्यातील हा तरुण उच्चशिक्षित होताच शिवाय त्यांना कोल्हापूरच्या शाहूकालीन परंपरेचा वारसा लाभला होता. त्यामुळेच त्यांनी आयुष्याचा सर्वांत मोठा कालखंड कॉँग्रेस पक्षात घालविला असला तरी तो सत्यशोधकी परंपरेची पार्श्वभूमी होती. त्या मुशीत तयार झाल्याने विचारांतील डावे पण त्यांच्या नसा-नसांत भिनले होते. त्यामुळे उपेक्षित घटकांबद्दल अतीव कणव त्यांच्यामध्ये होती. कॉँग्रेस पक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या स्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेत भागीदारी केली होती. तो कालखंड स्वातंत्र्याची पहाट पाहणारा होता.

समाज हा सातत्याने बदलणारी प्रक्रिया असते, यावर त्यांचा विश्वास होता, यासाठी नेहमी परिवर्तनाचा विचार मांडला पाहिजे, त्यासाठी राजकीय संघटन केले पाहिजे, याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. राज्याचे कृषीमंत्री परिवहनमंत्री, सहकारमंत्री, अर्थमंत्री अशी महत्त्वाची खाती हाताळताना असंख्य निर्णय त्यांनी घेतले. एकदा मला कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत देत असताना सहकारमंत्री म्हणून सहकार कायद्याचा मसुदा स्वहाताने लिहिला, याचा किस्सा सांगत होते. सहकार चळवळ बळकट होण्यासाठी तिला वैधानिक आधार दिला पाहिजे, हा तो विचार होता. त्याचा गैरवापर चालू झाला, तेव्हा त्यावर भाष्य करणे त्यांनी टाळले नाही तर कृतिशील संघर्ष करून त्यावर प्रहार केला. सहकार चळवळीचा मूळ प्रवाहच बाजूला पडत असेल तर गप्प बसून चालणार नाही, ही त्यांची वैचारिक धारणा होती. तिला त्यांनी नैतिक अधिष्ठानही दिले ते यशस्वीही करून दाखविले. परिवहनमंत्री असताना ‘गाव तेथे एस.टी.’ ही संकल्पना त्यांनी राबविली तेव्हा ही गोष्ट अशक्य कोटीतील वाटत होती; पण ती यशस्वी झाली आहे. गावोगावी दळणवळणाचे साधन निर्माण झाल्याने त्याचे गावच्या परिवर्तनात स्थान काय राहिले, याचे उत्तम वर्णन करता येऊ शकते. त्याचे संशोधनच व्हायला हवे. एस.टी. गाडीने ग्रामीण चेहरा बदलण्यात मोठी कामगिरी बजावली आहे. तिची सुरुवात यशवंतराव मोहिते यांनी केली आहे.

लोकशाही पद्धतीने पक्ष चालविण्याची गरजही ते ओळखतात. सन १९७७ मध्ये कॉँग्रेसचा मुख्यमंत्रिपदासाठी नेता निवडताना वसंतदादा पाटील विरुद्ध यशवंतराव मोहिते अशी लढत झाली. वसंतदादांना अधिक आमदारांची मते मिळाली. दादांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यालाच आव्हान दिले होते. निवडणूक झाली होती; मात्र कटुता नव्हती. त्याच वसंतदादांच्या मंत्रिमंडळात अर्थखात्याचा कार्यभार यशवंतराव मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यांची वैचारिक धारणा इतकी पक्की होती की, किरकोळ राजकीय डावपेचासाठी जागाच नव्हती. एका धारणेने ते राजकारणाकडे पाहत होते. एक खंत मात्र व्यक्त करावीशी वाटते की, वसंतदादा भले मोठे संघटक असतील, पण त्यांच्याही आधी यशवंतराव मोहिते भाऊंना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळायला हवी होती.

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावलेल्यांपैकी ज्यांना ही संधी मिळणे आवश्यक वाटते, त्यात यशवंतराव मोहिते भाऊ यांचे नाव प्रथम क्रमांकावर घ्यायला हवे. महाराष्ट्रÑ एका चांगल्या, कर्तबगार आणि सर्जनशील मुख्यमंत्र्याला मुकला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यांना राजकीय संधी मिळाली, पण एका मर्यादेपर्यंतच मिळत राहिली. क-हाड लोकसभा मतदारसंघाची परंपरा मोडत सन १९८० मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली. पूर्वीची परंपरा होती की, आनंदराव चव्हाण आणि प्रेमिलाकाकी चव्हाण यांनाच सन १९५२ पासून उमेदवारी मिळत आली होती. ती प्रथमच परंपरा मोडली. यशवंतराव भाऊ एक अनुभवसंपन्न नेते संसद सदस्य झाले होते. कॉँग्रेसला बहुमत मिळाले होते ते उच्चशिक्षित होते. परिणामी इंग्रजी किंवा हिंदी भाषेचा अडसर येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळायला हवे होते. ते घडले नाही.

संसदीय राजकारणापासून फारकत घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राला एक नवी दिशा देणारे सहकार चळवळीतील राजकारण केले. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराविषयी ते असमाधानी होते. त्याविरुद्ध त्यांनी आवाज उठविला. शेतकऱ्यांना संघटित केले. सत्तारूढ सहकारसम्राटांना सत्तेवरून दूर करणे, हे केवळ अशक्य अशी संपूर्ण महाराष्ट्रात धारणा होती. मात्र, यशवंतराव भाऊ यांनी ती करून दाखविली. त्याला वैचारिक आणि नैतिक अधिष्ठान होते. ही संपूर्ण प्रक्रिया आमच्या पिढीतील पत्रकार सक्रिय असताना झाली आहे. तो आमच्याही उमेदीचा काळ होता. सहकारातील हा संघर्ष एखाद्या चित्रपटाला शोभेल असा वाटत होता. ‘भाऊबंदकी’ अशी त्याची आम्ही संभावना करत होतो. यावर प्रचंड रागाने आणि तडफेने यशवंतराव भाऊ बोलत असत. ही भाऊबंदकी नाही, ही दोन भावांची लढाई नाही किंवा भांडण नाही. सहकार चळवळीचा मूळ विचारांसाठीचा संघर्ष आहे. सहकार हा समाजातील उपेक्षित, असंघटित वर्गाला ताकद देणारा विचार आहे. त्यालाच नख लागत असेल तर त्याविरुद्धचा संघर्ष हा भाऊबंदकीचा कसा असू शकतो, असा खडा सवाल ते करत असत. तो त्यांनी यशस्वी करून दाखविला.

महाराष्ट्राने त्यांना एक मंत्री, विचारवंत म्हणून पाहिले होते. सहकाराच्या शुद्धिकरणाचा नवा आशेचा किरण म्हणूनही पाहिले. रेठरे बुद्रुक गावच्या कृष्णाकाठावर उर्वरित आयुष्य घालविताना हा माणूस कधीकाळी आमदार, नामदार, खासदार होता असे जाणवायचे नाही. त्या घरातील प्रशस्त बैठकीत आजूबाजूला हात लावेल तेथे नवनवीन पुस्तके, मासिके, वृत्तपत्रांची कात्रणे असायची. संदर्भाशिवाय बोलायचे नाहीत. त्यांनी शाहू पुरस्कार स्वीकारताना केलेले भाषण एक आदर्श भाषणाचा नमुना तर होताच; पण त्यांची जीवननिष्ठा कोणत्या वैचारिक पायावर उभी आहे याचा तो आलेख होता. शाहू महाराज त्यांना दैवत वाटत होते.

याच शाहूनगरीत त्यांची वैचारिक जडणघडण झाली होती. ती शिदोरी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांची साथसंगत करत राहिली. गरिबांच्या कल्याणाचा आर्थिक अजेंडा जगाला देणाºया कार्ल मार्क्सची विसाव्या शतकात जगावर छाप होती, तशी छाप यशवंतराव मोहिते ऊर्फ भाऊ यांची होती. त्यांना समाजातील अखेरचा घटक दिसत होता. त्यांच्या कल्याणाचा विचार मनात तेवत होता. म्हणून त्यांना ‘कृष्णाकाठचे कार्ल मार्क्स’ म्हटले जायचे. त्यांनी कधी विचारांशी तडजोड केली नाही, की फारकत घेतली नाही. एक वैचारिक अधिष्ठान त्यांच्या रूपाने महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला लाभले.


- वसंत भोसले
संपादक, लोकमत, कोल्हापूर

Web Title:  Karl Marx of Krishnakath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.