कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत सत्तारूढ गटाच्या पॅनेल निश्चितीत कागल तालुक्याचे राजकारण हाच कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत. विद्यमान संचालिका अरुंधती घाटगे यांना पुन्हा पॅनेलमध्ये घेऊ नका, या बोलीवर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी तडजोड करण्याच्या तयारीत आहे. माजी आमदार के. पी. पाटील यांचा मुलगा रणजित यांनाही उमेदवारी मिळावी, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत.दोन दिवसांपूर्वी माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यात प्राथमिक बैठक झाली. मंडलिक हे जर महाडिकांचा नाद करणार नसतील तर त्यांच्याच नेतृत्वाखाली विरोधी पॅनेल आकार घेऊ शकते. तसे झाले तर मग राष्ट्रवादीचा सत्तारूढ गटाबरोबर जाण्याचा मार्ग मोकळा होतो. सत्तारूढ गटाकडून राष्ट्रवादीला दोन-तीन गोष्टींची अपेक्षा आहे. त्यामध्ये ‘कागल’मधून रणजित पाटील यांची उमेदवारी कायम राहावी. कारण रणजित पाटील यांच्याऐवजी आपल्या गटाचे पंचायत समिती सदस्य भूषण पाटील यांना उमेदवारी दिली जावी, असा मंडलिक यांचा आग्रह आहे. दुसरे संजय घाटगे यांच्या गटाला संघात प्रतिनिधीत्व दिले जाऊ नये. विद्यमान संचालक मंडळात घाटगे यांच्या पत्नी अरुंधती ह्या आहेत; परंतु आता संजय घाटगे यांना त्यांच्याऐवजी अंबरिश घाटगे यांच्यासाठी उमेदवारी हवी आहे. संजय घाटगेंना उमेदवारी नको यामागे दोन-तीन कारणे आहेत. आता तालुक्याच्या राजकारणात त्यांच्या गटाकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गोकुळ या सत्ता आहेत. ‘गोकुळ’च्या सत्तेमुळे आर्थिक ताकद मिळते. पुढच्या विधानसभेला कदाचित अंबरिश घाटगे हेच उमेदवार असतील. त्यांना अडवायचे म्हणून उमेदवारीस विरोध केला जात आहे. एकवेळ संजय मंडलिक यांच्या पत्नीस पॅनेलमधील घेतले तरी चालेल, परंतु घाटगे नकोत, असाही पर्याय राष्ट्रवादीकडून पुढे आणला असल्याची चर्चा आहे.कागल तालुक्यातील दूध संस्थांच्या ठरावाचा विचार केल्यास सध्या संजय घाटगे गटच सगळ््यात पुढे आहे. ढोबळमानाने त्यांच्याकडे १२८, मुश्रीफ गट ७०, मंडलिक गट ६५ आणि रणजित पाटील यांच्याकडे ५० ते ५५ ठरावधारक संस्था आहेत. त्यामुळे संजय घाटगेंना पॅनेलमधून वगळणे सोपे नाही. दुसरे असे की, संजय घाटगे हे संघात माजी आमदार पी. एन. पाटील यांचेच नेतृत्व मानतात. त्यामुळे संजयबाबांसाठी पी. एन. कोणत्याही टोकाला जाऊन आग्रही राहतील. मुश्रीफ यांचे आजारपण व राष्ट्रवादीची एकूण तयारी पाहता ते स्वतंत्र पॅनेल करून लढण्याची शक्यता कमी वाटते. माजी आमदार के. पी. पाटील यांचा मुलगा रणजित यांचेही नाव उमेदवारीसाठी पुढे आल्याचे समजते. त्यामुळे राष्ट्रवादीची रसद पुरवून सत्तारूढ गटाशी हातमिळवणी केली जाऊ शकते. आता तर तशाच हालचाली दिसत आहेत. (प्रतिनिधी)खांदेपालटसंघात कोडोलीचे विश्वास जाधव हे भटक्या विमुक्त प्रवर्गातून संचालक आहेत. ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या गटाचे ते मानले जातात. त्यांनाही विरोध सुरू झाला आहे; परंतु नरके त्यास अजिबात तयार नाहीत. जागा अठराच आणि ऐंशी इच्छुक त्यामुळे अडचणी निर्माण करेल अशी नाराजी न ओढावता खांदेपालट करण्याचे नेत्यांचे प्रयत्न आहेत.
पॅनेल निश्चितीत ‘कागल’च कळीचा मुद्दा
By admin | Updated: January 19, 2015 00:49 IST