कोल्हापूर : मौजे वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील केदारलिंग, श्री जोतिबा मूळ मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार असल्याने मंगळवार ते शुक्रवार (दि. २१ ते २५) देवाचे दर्शन बंद राहील. भाविकांच्या सोयीसाठी या काळात देवाची उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी मंदिरातील कासव चौक येथे ठेवण्यात येईल.मूळ मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाला कळवले होते. त्यानुसार दिल्ली व पुण्यातील भारतीय पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी करून देवस्थान समितीला ३ तारखेला अहवाल दिला. यात भारतीय पुरातत्व विभागाने मूर्तीवर रासायनिक संवर्धन करण्याची सूचना केली. त्यासाठी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी मूर्तीची पाहणी केली. देवस्थान समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी, गावकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारपासून मूर्तीवर रासायनिक संर्वधन प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारपासून चार दिवस ही प्रक्रिया चालेल. या काळात भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. मात्र कासव चौक येथे कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन देवस्थान समिती व पुजाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन समितीने केले आहे.
Kolhapur: जोतिबा देवाचे उद्यापासून चार दिवस दर्शन बंद, मूळ मूर्तीचे होणार रासायनिक संवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:57 IST