राजेंद्र पाटील - भोगावती सहकारी साखर कारखान्यात सुरू असलेल्या नोकरभरती प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला असून, भरतीचा आकडा सहाशेच्या घरात गेला आहे. त्यामुळे मेगा भरतीची जम्बो सर्कस झाली आहे. सध्या कामावर असणाऱ्या आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलांना, कुटुुंबीयांना, तर कार्यक्षेत्राबाहेरील कित्येक जणांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे गेली कित्येक वर्षे राष्ट्रवादीचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांत असंतोष आहे.कारखान्यातील नोकरभरती कारखान्याच्या हिताची नाही, हे आता स्पष्ट होत असून, वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याचा प्रयत्न नेत्यांपासून संचालक आणि प्रमुख कार्यकर्त्यांकडून सुरू आहे. ३९३ जागा रिक्त आहेत, त्यासाठी भरती होणे आवश्यक आहे, हे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात आहे. तीन कर्मचारी लागतात तेथे दहाजण सध्या काम करू लागले आहेत. कोण कोणत्या गावातून कामावर आला आहे, हे तेथील प्रमुख अधिकाऱ्यांनादेखील समजेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील म्हासुर्ली, खामकरवाडी, धामोड, बिद्री कारखाना कार्यक्षेत्रातील तरुणांचा समावेश दिसू लागला आहे. आम्ही पैसे मोजून आलोय, असे छाती ठोकत काही तरुण सांगू लागले आहेत.अशी भरती झाली आहे. काँग्रेसच्या गोटातील अनेक तरुणांना संधी देण्यात आली आहे, तर भरतीचा मोठा कहर म्हणजे, सध्या कामावर रुजू असणाऱ्या कामगारांच्या मुलांना, भावांना संधी दिली जात आहे.या अनागोंदी भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत प्रचंड असंतोष पसरला असून, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासमोर उद्रेक होण्याची शक्यता आहे. कोणत्या नेत्यांना, कोणत्या संचालकांनी किती रकमेचा ढपला पाडला आहे, हे मुश्रीफ यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबतीत हसन मुश्रीफ यांनी भोगावतीच्या संचालकावर नजर का फिरविली नाही, असे विचारले जाऊ लागले आहे.‘भोगावती’त नोकरभरतीच्या निमित्ताने आर्थिक व्यवहार होत असल्याचे गेल्या तीन-चार महिन्यांपासून चर्चा होत असताना हा आरोप खोटा असल्याचे कोणाही कारखान्याने स्पष्ट केलेले नाही. इतरवेळी काँग्रेसने केलेले आरोप खोडण्यात स्पर्धा असते; पण आता कोणीही पुढे येत नाही.पुन्हा सोळांकूरभरती भोगावती कारखान्याची, मात्र इच्छुकांची सोळांकूरला रीघ लागली आहे. राधानगरी-करवीर तालुक्यांतील कित्येकजण या मार्गावर जाऊ लागले आहेत. कोण आपलं जमवायला, तर कोण जमलेल्यांचा पत्ता कट करायला जात आहे.
‘भोगावती’च्या मेगा भरतीची झाली जम्बो सर्कस
By admin | Updated: November 24, 2015 00:20 IST