कोल्हापूर : रात्रगस्त घालणाऱ्या लक्ष्मीपुरी पोलिसांच्या भरधाव जीपने शिवाजी पुतळ्याच्या दगडी कठड्यास जोराची धडक दिली. त्यामध्ये कठड्याचे दगड कोसळून व लोखंडी बॅरिकेट्स वाकून मोठे नुकसान झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रातोरात तातडीने कठड्याचे कोसळलेले दगड रचून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरवासीयांतून पोलिसांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा प्रकार काल, मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला. याबाबत अधिक माहिती अशी, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलिस रात्रगस्त घालत असताना शिवाजी चौकामध्ये त्यांची भरधाव जीप (एमएच ०९ एजी १३१३) थेट शिवाजी महाराज पुतळ्याच्या संरक्षक कठड्याला धडकली. त्यामध्ये कठड्याच्या दगडी खांबाचे नुकसान झाले. तर लोखंडी बॅरिकेट्स वाकले गेले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी रातोरात दगडी खांब एकमेकांवर रचून ठेवले; तर जीप दुरुस्तीला टाकत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पोलीस गायब झाले होते. संबंधित जीपचा चालक मद्यप्राशन करून होता का? घडलेल्या अपघाताचा पंचनामा का केला नाही? या सर्व गोष्टी संशयास्पद वाटत असल्याने बजरंग दलाचे शहरप्रमुख महेश उरसाल यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना जाब विचारला; परंतु पोलिसांनी त्यांना सारवासारवीचे उत्तर देऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या या प्रकाराने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती. दरम्यान, जीपचे पुढचे चाक अचानक जॅम झाल्याने हा प्रकार घडल्याचे काही पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी) कोल्हापुरात लक्ष्मीपुरी पोलिसांच्या भरधाव जीपने मंगळवारी मध्यरात्री शिवाजी पुतळ्याच्या कठड्यास जोराची धडक दिली.
पोलिसांच्या भरधाव जीपची पुतळ्याच्या कठड्यास धडक
By admin | Updated: November 20, 2014 00:00 IST