संतोष पाटील - कोल्हापूर -पै-पाहुण्यांच्या कुंडलीसह प्रत्येक मतदारांपर्यंत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या पोहोचून त्यांना ‘प्रसन्न’ करून घेण्यासाठी कार्यकर्त्यांची चाललेली खटपट, दररोज एका उमेदवाराची गावात येणारी रॅली, दर पंधरा मिनिटांच्या अंतराने वाजणारी प्रचाराची रिक्षा, सकाळी व संध्याकाळी एका तरी उमेदवाराचे होणारे दर्शन, असे अस्सल निवडणुकीचे वातावरण कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात आहे. कार्यकर्त्यांत टोकाची ईर्ष्या असली तरीही मतदार मात्र दररोज बदलणाऱ्या परिस्थितीकडे स्तब्ध होऊनच पाहत असल्याचे चित्र आहे.शहरी व ग्रामीण असा संमिश्र चेहरा असणाऱ्या दक्षिण मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र, प्रचार, वातावरण व मतदारांचा मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न आज, मंगळवारी दिवसभर फिरून ‘लोकमत’ टीमने घेतला. जवाहरनगर, शास्त्रीनगर, आर. के. नगर, मोरेवाडी, पाचगाव, गिरगाव, दऱ्याचे वडगाव, चुये, कावणे, कळंबा, संभाजीनगर, गांधीनगर, वळीवडे, चिंचवाड, फुलेवाडी, आदी परिसरातील निवडणुकीची रंगत व जोर तपासण्याचा प्रयत्न प्रस्तुत टीमने केला.जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष्यवेधी असलेल्या येथील लढतीबाबत मतदार राजा मात्र विश्लेषण करण्यातच दंग आहे. ‘गावात सर्वाधिक मतदान साहेबांना मिळेल. मात्र, मोदी पण चांगलं वाटतात हो...! गावकऱ्यांचा कायबी अंदाज येईना बघा’, अशी बोलकी प्रतिक्रिया दऱ्याचे वडगाव येथे सकाळी गाडीची वाट पाहत बसलेल्या बाळू खाडे यांनी दिली. दररोज बदलणाऱ्या राजकीय आखाड्यामुळे मतदाराची मती मात्र गुंग झाली आहे. प्रत्येकाने नेमके काय करायचे, हे मनात पक्के ठरविले आहे. उघड बोलून कशाला अंगावर घ्या, अशीच सर्वसमावेशक मानसिकता ‘दक्षिण’मधील मतदारांची दिसली. मतदारसंघात कोठेही पोस्टरबाजी नाही किंवा पक्षाचे झेंडे नाहीत. प्रचाराचा भपकेबाजपणा जाणवत नाही. तरीही दररोज प्रत्येक मतदाराकडे एक तरी उमेदवार किंवा त्याचा प्रतिनिधी भेटत आहे. गांधीनगर, वळिवडेसह मतदारसंघात कसबा बावड्यासह ‘दक्षिण’मधील कार्यकर्ते पै-पाहुण्यांसह मतदारांची यादी घेऊन फिरताना दिसतात, तर यापूर्वी कधीही भगवी-हिरवी टोपी डोकीवर न घेतलेले कार्यकर्ते जिवाचे रान करत आहेत. ग्रामीण भागात भात कापणी असल्याने बहुतांश मतदार शिवारात आहेत.गावात व गल्लीत एखाद्या उमेदवाराची रिक्षा किंवा जीप ‘गाणे वाजवून’ गेली की, काही मिनिटांत दुसरीही हजर. गावात एका उमेदवाराचे, तर वेशीवर दुसऱ्या उमेदवाराचे कार्यकर्ते जाहिराती हातात घेऊन तयारच आहेत. कार्यकर्त्यांत टोकाची ईर्ष्या आहे. मतदार मात्र शांतपणे गावचा विकास, विश्वासार्हता, लाट, मताधिक्य, आश्वासने, प्रत्यक्ष स्थिती, आदी कसोट्यांवर पडताळून पाहत आहे. विजय कोणाचाही होवो, ‘दक्षिण’चा लढा यंदाही मागील वेळीप्रमाणे लक्ष्यवेधी व क्षणाक्षणाला ठोके वाढविणारा असाच आहे. यात तसूभरही फरक पडलेला नाही.
ईर्ष्या कार्यकर्त्यांतच; मतदार स्तब्ध
By admin | Updated: October 8, 2014 21:47 IST