कोल्हापूर : पुणे शिक्षक मतदारसंघातून दणदणीत विजय संपादन केल्यानंतर आमदार प्रा. जयंत आसगावकर यांचे शनिवारी सायंकाळी कोल्हापुरात आगमन झाले. महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
प्रा. आसगावकर यांनी शिक्षक मतदारसंघातून त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी दत्तात्रय सावंत यांचा साडेदहा हजार मतांनी पराभव करून विजय मिळविला. दोन दिवस मतमोजणी सुरू राहिल्याने शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी त्यांचा विजय अधिकृतपणे जाहीर केला. त्यानंतर त्यांनी पुणे शहर काँग्रेस कमिटीला भेट देऊन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. त्यानंतर शनिवारी ते कोल्हापूरकडे रवाना झाले. पुण्यातून येताना कऱ्हाड येथे त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी चार वाजता थेट ‘अजिंक्यतारा’ येथे जाऊन पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ते ताराराणी चौकात आले. आमदार आसगावकर यांचे ताराराणी चौकात आगमन होताच समर्थकांनी एकच जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
--------------------------------
सतेज पाटील यांना अभिमान वाटेल असे काम करू - जयंत आसगावकर
पुणे शिक्षक मतदारसंघासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जे सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचा मी ऋणी आहे. आगामी काळात त्यांना अभिमान वाटेल असेच काम करू. त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिली. आसगावकर यांनी शनिवारी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. शिक्षकांनी दिलेल्या संधीचे सोने करीत शिक्षकांसह संस्थाचालक व विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
--------------------------------
‘करवीर’ला चार आमदार
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली असून, विधानसभेचे चार व विधान परिषदेचे दोन असे पक्षाचे सहा आमदार झाले. त्याचबरोबर करवीर तालुक्यात पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यानंतर आसगावकर यांच्या रूपाने चौथे आमदार मिळाले.
--------------------------------
डी. डी. आसगावकर असते तर..
डी. डी. आसगावकर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांना विधान परिषदेची संधी मिळावी, अशी शिक्षकांची इच्छा होती. ते नसेनात, मुलगा आमदार झाला, आता डी. डी. आसगावकर असते तर...! अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या.