हुपरी : जवाहर सहकारी साखर कारखान्याकडे नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात उसाची नोंद झाली असल्याने यावर्षीदेखील राज्यात सर्वात जास्त उच्चांकी ऊस गाळप निश्चितपणे होणार आहे. कारखान्याचे संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या दूरदृष्टीमुळे जवाहर कारखाना सर्वच बाबतीत अग्रेसर ठरत आहे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले.
संपूर्ण साखर उद्योगाला मार्गदर्शन करणाऱ्या भारतीय शुगर संस्थेच्या २०२१ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा सोमवारी (दि. २५) सायंकाळी कारखाना सभागृहात संपन्न झाला. कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, संचालक विलासराव गाताडे आदींच्या हस्ते यावेळी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले, या सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यकारी संचालक मनोहर जोशी म्हणाले, साखर उद्योगात सातत्याने नवनवीन प्रयोग यशस्वीपणे राबवून त्याचा प्रत्यक्ष लाभ संपूर्ण साखर उद्योगाला मिळवून देण्यासाठी भारतीय शुगर संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. या संस्थेच्या वतीने यापूर्वी संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे याना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी संचालक अण्णासाहेब गोटखिंडे, सूरज बेडगे, अभयकुमार काश्मिरे, आदगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी-भारतीय शुगर संस्थेच्या २०२१ दिनदर्शिकेचे प्रकाशन जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले, कार्यकारी संचालक मनोहर जोशी, संचालक विलासराव गाताडे आदींच्या हस्ते करण्यात आले.