कोल्हापूर : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलामध्ये जर सतेज पाटील यांच्या विचारांचे पदाधिकारी होणार असतील, तर त्यांना जनसुराज्यचा पाठिंबा द्यावा, असा आग्रह आम्ही विनय कोरे यांच्याकडे धरणार असल्याची माहिती विजयसिंह माने आणि माजी समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे यांनी दिली. माने हे जिल्हा परिषद सदस्या मनीषा माने यांचे पती आहेत.
शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या दालनामध्ये सहज गप्पा मारताना माने आणि महापुरे यांनी हा विषय मांडला आहे. जर जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी बदल होणार असेल, तर सतेज पाटील यांना मानणारे जे कोणी पदाधिकारी होऊ इच्छित असतील त्यांना जनसुराज्यने पाठिंबा द्यावा, अशी आमची इच्छा आहे. तसा आग्रह आम्ही आमच्या पक्षाचे नेते विनय कोरे यांच्याकडे त्यावेळी धरू, असे माने यांनी सांगितले. मात्र, हे सगळे होताना शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांचे पद बदलू नये, अशी जनसुराज्यची मागणी असल्याचेही माने यांनी सांगितले.
चौकट
पाठिंबा नाही, आग्रह धरू
जनसुराज्य जिल्हा परिषदेत सतेज पाटील यांना पाठिंबा देणार का, अशी विचारणा केली असता माने म्हणाले, पाठिंबा देण्याचा निर्णय मी जाहीर करू शकत नाही. तो अधिकार नेत्यांचा आहे. मात्र, पाठिंबा द्या, असा आग्रह मात्र आम्ही धरू.