पेले, मॅरेडोना, मेस्सी,नेमार, झिनेदिन झिदान, रोनाॅल्डो ख्रिस्तीनो, बेकॅहम, एमबाटी अशा दिग्गज फुटबाॅलपटूंचे चाहते जगभरात आहेत. असेच चाहते कोल्हापुरातही आहेत. विशेषत: अर्जेटिनाने १९९० च्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या दरम्यान आपली जर्शी निळ्या पांढऱ्या रंगात केली. त्यापासून कोल्हापुरातील खंडोबा तालीम मंडळ व दिलबहार तालीम मंडळाने अशीच जर्शी आपल्या संघासाठी कायम केली. त्यामुळे कोल्हापुरात निळ्या पांढऱ्या अर्थात अर्जेटिनाचा चाहता वर्ग म्हणून या दोन संघांकडे पाहिले जाते. त्यामुळे रविवारी सकाळी अर्जेटिनाच्या एंजल डी मारी ने गोल करताच कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाच्या परिसरातील चाहत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. हीच आघाडी कायम ठेवून अर्जेटिनाने विजेतेपद खिशात घातल्यानंतर या चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांनी फटाके उडवून आणि हलगीच्या कडकडाटात विजयी जल्लोष केला. या जल्लोषाची व्हिडिओ क्लिप दिवसभर सोशिल मीडियावरून सर्वत्र व्हायरल झाली होती.
फुटबाॅल फिवरचीही चर्चा
गेल्या वर्षभरात कोरोना संसर्गामुळे कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम सलग दुसऱ्या वर्षी अनिश्चत बनला आहे. त्यामुळे सरावासह स्पर्धेपासून कोल्हापुरातील सर्व दिग्गज संघ बाजूला आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या फुटबाॅल पंढरीवर काहीअंशी मरगळ आली होती. ती कोपा अमेरिका युरोपियन फुटबाॅल चषक स्पर्धेमुळे दूर झाली. त्यात के.एस.ए. तर्फे मंगळवारी खास खेळाडूंकरिता फिटनेस व मानसिकता याबद्दल ऑनलाइन कार्यशाळा आयोजित केली आहे. या तिन्हीमुळे कोल्हापुरात पुन्हा फुटबाॅलचा फिवर आल्याची चर्चा होत आहे.
फोटो : ११०७२०२१-कोल-खंडोबा तालीम
ओळी : कोपा अमेरिका फुटबाॅल स्पर्धेचे विजेतेपद अर्जेटिनाने पटकाविल्यानंतर रविवारी सकाळी शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाच्या परिसरात अर्जेटिनाच्या चाहत्यांनी चषक उंचावून जल्लोष केला.