कोल्हापूर : आणीबाणीच्या काळात उसळून रस्त्यावर उतरलेला मध्यमवर्गीय आता आर्थिक स्थिरता आल्यानंतर थंडावला आहे. अर्थसंपन्नता आली तशी वैचारिक संपन्नता कमी झाली. त्यामुळे कोणीही कसेही वागले, कसेही निर्णय घेतले, कोणावरही अन्याय केला, तरी कोणाला कशाचेच काही वाटत नाही. लोकशाहीची आसही राहिली नाही. ही देशभरातील अवस्था धाेकादायक आहे, असा इशारा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांनी दिला.डॉ. सुनीलकुमार लवटे अमृतमहाेत्सवी सत्कार समारंभात ते बोलत होते. ‘महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा इतिहास, वर्तमान आणि भविष्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार होते. राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जळगावपासून बेळगावपर्यंतच्या लवटेप्रेमींनी तुडुंब गर्दी केली होती. यावेळी डॉ. लवटे आणि रेखा लवटे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, लवटे यांच्याविषयीच्या दोन पुस्तकांचेही प्रकाशन करण्यात आले.कुबेर म्हणाले, इतिहासाकडे पाहिले, तर तर्कवादाचा देशभरातील उगम महाराष्ट्रात झाला. प्रबोधनाची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. महात्मा फुलेंनी बौद्धिक पुनरूत्थानाची चळवळ सुरू केली. बाळशास्त्री जांभेकरांनी शोषण हा शब्द पहिल्यांदा वापरला. ताराबाई शिंदे, विठाबाई, चिपळूणकर, रानडे यांच्या काळाचा आवश्यक अभ्यास झाला नाही. महाराष्ट्राचा हा तुटलेला वैचारिक धागा कसा जोडायचा हा प्रश्न आहे. सध्याची भारतीय मानसिक पौरूषता नियम मोडण्याच्या क्षमतेशी जोडली गेली आहे.महाराष्ट्राबाबत बोलताना ते म्हणाले, १९९२ पूर्वीचा मुंबई दंगल होण्याआधीचा आणि नंतरचा महाराष्ट्र असे दोन महाराष्ट्र दिसून येतात. अर्थसुधारणांनी मध्यमवर्गीयांना आर्थिक स्थैर्य आले आणि प्रबोधनाची गरज वाटेनाशी झाली. सुखांतपणा, डोक्याला ताप नको ही वृत्ती जर आपले वर्तमान असेल, तर भविष्य अंधकारमय आहे. परदेशात नोकरीसाठी जाणारी मुले हे मोठे आव्हान भारतासमोर आहे.सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. जी. पी. माळी यांनी प्रास्ताविक केले. संदीप मगदूम, निशांत गोंधळी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. माणिकराव साळुंखे, राजन गवस, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अर्जुन चव्हाण, डाॅ. रमेश जाधव, महावीर जोंधळे, हसन देसाई, डॉ. बी. एम. हिर्डेकर, प्रभाकर हेरवाडे, डॉ. विश्वास सुतार, मेधा पानसरे, डॉ. मंजुश्री पवार, सौम्या तिरोडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वर्षभरातील कार्यक्रमांबद्दल कौतुकडॉ. जयसिंगराव पवार यांनी लवटे यांच्या अमृतमहाेत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रम राबविण्यात आले याचे कौतुक केले. ते म्हणाले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या १८ खंडांचे लवटे यांनी केलेले काम ही त्यांची मोठी महाराष्ट्र सेवा आहे. सयाजी गायकवाड यांना राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्राची प्रबोधनपरंपरा जपण्यासाठी इतिहासाचा डोळस अभ्यास आवश्यक आहे.
चिमटे, टोले आणि हास्याचा खळखळाटसर्वच वक्त्यांनी आपल्या बोलण्यात कुठेही सत्तारूढांचे एकदाही नाव घेतले नाही, परंतु असे काही दाखले दिले आणि आता तुलना तुम्हीच करा, असे सांगत अप्रत्यक्ष टोले असे मारले की, गडकरी सभागृह काही वेळा हास्यात बुडाले, तर काही वेळा टाळ्यांचा कडकडाटात हरवले.