कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथील अलगीकरण कक्ष आदर्शवत ठरत आहे. लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून या अलगीकरणाची निर्मिती करण्यात आली आहे. कुमार शाळेतील या कक्षामध्ये रुग्णांना सर्व सोयीसुविधा मिळत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. या कक्षाला तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांनी भेट देऊन कौतुक केले.
गावात कोरोना रुग्णांची संख्या दीडशेच्यावर गेल्याने गावाची वाटचाल हॉटस्पॉटच्या दिशेने होत होत होती. आजारापेक्षा इलाजाचा खर्च मोठा असल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत होती. कोरोना रुग्णांना संस्थात्मक अलगीकरण करून आरोग्य विभागाकडून मोफत उपचार देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला होता. त्यानुसार ग्रामपंचायत, हेरवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक सुतार यांच्यासह गावातील तरुण मंडळाचे कार्यकर्ते, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने कुमार विद्यामंदिर याठिकाणी अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला. या अलगीकरण कक्षासाठी लोकसहभागातून दहा बेड आणण्यात आले. देणगीदारांची संख्या वाढत गेली आणि प्रत्येक रूममध्ये कोरोना रुग्णांसाठी विविध सुविधा पुरविण्यात आल्या.
सध्या या अलगीकरण कक्षात ११ रुग्ण उपचार घेत असून ३९ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने वेळोवेळी रुग्णांची तपासणीही करण्यात येते. सरपंच सुरगोंडा पाटील यांच्यासह सदस्य अलगीकरण कक्षाला वेळोवेळी भेट देऊन रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस करत असल्याने आधार वाटत आहे.
फोटो - ०७०६२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - हेरवाड (ता. शिरोळ) येथे लोकसहभागातून कुमार विद्यामंदिर शाळेत अलगीकरण कक्ष उभारण्यात सुरू करण्यात आला आहे.