गडहिंग्लज : गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात आणखी एक ऑक्सिजन प्लँट उभारण्यात येणार आहे. प्लँटसाठी जागेची पाहणी करण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या प्लँटची व नव्या प्लँटसाठी जागेची पाहणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रुग्णालयाला भेट देऊन केली.
नवीन प्लँटच्या उभारणीसाठी येत्या आठ दिवसांत त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. याबाबत बांधकाम, वीज वितरणसह संबंधित विभागांना आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालय व ऑक्सिजन प्लँटसाठी वीजपुरवठा खंडित होऊ नये यासाठी एक्सप्रेस फिडर बसविण्यासाठी आराखडा मंजुरीसाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या.
सध्या सुरू असलेल्या प्लँटमध्ये सिलिंडर रिफिलिंगचे मशीन नाही. त्यामुळे सिलिंडर रिफिलिंग करता येत नाही. त्यासाठी नव्या प्लँटमध्ये रिफिलिंग करण्याचे बुस्टर मशीन देण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले. त्यामुळे खासगी दवाखान्यांतही सिलिंडर भरून देता येईल. ऑक्सिजन प्लँटमधून होणारा पुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठी प्लँटच्या नियंत्रणासाठी एका नोडल अधिकाऱ्याची निवड करावी. नवीन प्लँटमधून १२० जंबो सिलिंडर इतकी ऑक्सिजन निर्मितीची क्षमता असून, त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होणार नाही.