मिलिंद यादव, कोल्हापूरलतादीदी आणि शिवाजी पेठ हे एक सुंदर असं नातं होतं. सुरुवातीच्या काळात कोल्हापुरातला मंगेशकर कुटुंबियांचा वास्तव्याचा प्रश्न, त्यावेळेचे शिवाजी पेठेचे वस्ताद आणि पहिले ऑलिंपिक वीर दिनकरराव शिंदे यांनी सोडवला होता. त्यानंतर मंगेशकर कुटुंबीय आणि शिंदे कुटुंबीय यांचा एक घरोबा तयार झाला.
लहानपणी लतादीदी, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर ही बहिण भावंड कोल्हापूरला आल्यानंतर शिंदे यांच्या घरातच राहायचे. आजही शिवाजी पेठेतल्या उभा मारुती चौकात दिनकरराव शिंदे यांचे घर अगदी त्याच अवस्थेत आहे. दिनकरराव शिंदे यांची आई आनंदीबाई यांनी या मंगेशकर बहिण भावंडांना लहानपणी, (ते जेंव्हा जेंव्हा रहायला येतील तेंव्हा), त्यांना तेल लावून आंघोळ घालत असत. शिंदे यांचं घर हे या भावंडांसाठी सुट्टीला कोल्हापूरला आल्यानंतरचे राहण्याचे हक्काचे घर होते.
लहानाची मोठी होता होता दिनकरराव शिंदे यांचे धाकटे बंधू माधवराव शिंदे (माधवराव शिंदे हे माझे चुलत आजे सासरे) सुरुवातीला राजाराम महाराजांच्या इच्छेनुसार त्यांना जॉकी करण्याचा प्रयत्न झाला. पण ते त्यात फारसे रमले नाहीत. मग मास्टर विनायक रावांच्या बरोबर, त्यांच्या लॅब मध्ये काम करता करता माधवराव मराठी चित्रपटसृष्टीतील एक ख्यातनाम दिग्दर्शक झाले.