सरवडे : गेल्या गळीत हंगामातील शिल्लक साखर व चालू वर्षीही साखरेचे
प्रचंड उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखरेला भाव नाही. बाजारात साखरेचा उठाव नसल्याने कारखानदारी अडचणीत सापडली आहे. केंद्र शासनाने हमी भाव निश्चित करत शेतकरी व साखर कारखानदारी टिकण्यासाठी धोरण ठरवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी केले.
बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगासाखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभप्रसंगी ते बोलत होते. हंगामाची सांगता संचालक जगदीश पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या हस्ते केली. पाटील म्हणाले की, चालू गळीत हंगामात ६ लाख ८० हजार ४२६ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ८ लाख ६५ हजार ६०० साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे, तर सरासरी १२.७२ साखर उतारा मिळवला आहे, तर आजतागायत कारखान्याकडे ९ लाख साखर पोती शिल्लक आहेत. गतसालची २ लाख २३ हजार साखर पोती शिल्लक आहेत. या हंगामात आजअखेर सहवीज प्रकल्पातून ६ कोटी ३१ लाख ५०० युनिट वीजनिर्मिती झाली असून, त्यापैकी ४ कोटी ८५ लाख युनिट वीज विक्री केली आहे. अजूनही दीड महिना सहवीज प्रकल्प सुरू राहणार असून, सुमारे २ कोटी युनिट वीजनिर्मिती होईल.
यावेळी उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक आर.डी. देसाई यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.
.................
३० बिद्री
बिद्री कारखान्याच्या गळीत हंगाम समाप्ती समारंभप्रसंगी संचालक जगदीश पाटील, जयश्री पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते.