इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योगाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान असलेले उद्योगपती तसेच ना.बा. एज्युकेशन सोसायटीसह अनेक संस्थांचे पदाधिकारी, स्वदेशी ग्रृपचे सर्वेसर्वा मदनलाल मोहनलाल बोहरा (वय ८९ ) यांंचे सोमवारी निधन झाले. ते शेठजी म्हणून परिचित होते. त्यांच्या पत्नी गीतादेवी यांचे रविवारी (दि.२) रोजी निधन झाले आहे. त्यापाठोपाठ मदनलालजी यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह शहरात शोककळा पसरली आहे.
मदनलाल यांचा जन्म राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील नेणिया या खेड्यात सामान्य ब्राह्मण कुटुंबात ७ ऑक्टोबर १९३२ ला झाला. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचे मातृछत्र हरपले आणि दुष्काळ पडल्याने ते राजस्थानमधून बाहेर पडले. त्यांचे लातूर येथील नातेवाईक झुमरलाल बोहरा यांनी मदनलालजी यांना लातूर येथील मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल केले व पाचवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. कुटुंबाच्या जबाबदारीमुळे सोळाव्या वर्षी ते शिक्षण सोडून नोकरीच्या शोधात इचलकरंजीत दाखल झाले. आसारामजी बोहरा यांच्यासोबत त्यांनी व्यापाराचे धडे घेतले. १२ वर्षे नोकरी करून त्यांनी सन १९६१ मध्ये भागीदारीमध्ये स्वदेशी प्रोसेसर्स सुरू केली. दर्जेदार कापड प्रोसेसिंग व व्यवहार कुशलतेमुळे प्रोसेसर्सची भरभराट झाली व शहरातील एक अग्रगण्य प्रोसेसर्स असा नावलौकिक मिळवला.
प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी आणि सर्व काही शिकण्याच्या उर्मीमुळे ते शेठजी बनले. वस्त्रनिर्मिती, वस्त्रप्रक्रिया, वस्त्र व्यापार या क्षेत्रांमध्ये त्यांनी मोठे यश संपादन केल्याने वस्त्रोद्योगातील प्रमुख यशस्वी व्यक्तींमध्ये त्यांचा नामोल्लेख आवर्जून केला जातो.
इचलकरंजी कापड मार्केट आणि मदनलालजी बोहरा कापड मार्केट हे २ आधुनिक प्रकल्प बोहरा शेठजींच्या कर्तृत्वाची साक्ष देणारे आहेत. सन १९८० पासून शेठजी श्री. ना. बा. एज्युकेशन सोसायटीची धुरा सांभाळत असून शहराच्या या मातृ संस्थेला यशोशिखरावर पोहोचवले. शेठजींनी व्यंकटेश महाविद्यालय, श्रीमंत गंगामाई गर्ल्स् हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल, गोविंदराव व्यवसाय शिक्षण विभाग, काकासो कांबळे शाखेचा तिसरा मजला, श्री. ना. बा. बाल विद्यामंदिर या शाखांच्या भव्य, सुसज्ज आणि देखण्या इमारती बांधल्या. या इमारतीमधून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पारीख समाज आणि राजस्थानी समाज संघटनांच्या माध्यमातून शेठजींनी कार्याचा डोंगर उभारला आहे. पुष्कर या तीर्थक्षेत्री अखिल भारतवर्षीय पारीख आश्रमाची भव्य वास्तू उभारण्यात ही त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हरिद्वार येथेही अखिल भारतवर्ष पारीक समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदाची धुरा ही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या पत्नी गीतादेवी यांचे २ मे रोजी, तर ३ मे रोजी मदनलाल यांचे निधन झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.
फोटो ओळी
०३०५२०२१-आयसीएच-०२ - मदनलाल बोहरा