लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या नऊ महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २२५ रुपयांची वाढ केल्यानंतर शासनाने आता केवळ दहा रुपयांनी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. हा प्रकार म्हणजे आवळा देऊन कोहळा काढण्याचा आहे. आधीच कोरोनाचे जगणे मुश्कील केलेले असताना गॅस सिलिंडरच्या दरात दिवसेंदिवस केली जाणारी वाढ आणि आता दहा रुपयांनी कमी केलेले दर म्हणजे थट्टा करता काय राव, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.
गतवर्षी मार्चमध्ये कोरोना संसर्ग सुरू झाला. तीन महिने लॉकडाऊनमध्ये घरी घालवल्यानंतर जूनपासून सर्वसामान्यांना विस्कटलेली आर्थिक घडी सावरायला सुरुवात केली. आधीच चार महिने रोजगार बंद, नोकरी-धंद्यात मंदी, व्यवसायाची पिछेहाट, नागरिकांची कमी झालेली क्रयशक्ती आणि कोरोनाची भीती अशा चोहोबाजूंनी संकटाचा सामना करत जगण्याची धडपड करत असताना गेल्या नऊ महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या कालावधीत केंद्र शासनाने तब्बल २२५ रुपयांची दरवाढ केली. दोन दिवसांपूर्वी गॅस सिलिंडर दहा रुपयांनी स्वस्त झाले आहे; पण ज्या वेगाने आणि ज्या पटीत दरवाढ झाली त्या तुलनेत हा कमी झालेला दर म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.
--
असे वाढले दर
सिलिंडरचे वाढलेले दर असे
जून २०२० : ५९५
डिसेंबर २०२० : ६४७
जानेवारी २०२१ : ६९७.
फेब्रुवारी : ७२२
मार्च : ८२२
आताचा दर : ८१०
---
गॅस ही जीवनावश्यक बाब असल्याने त्याचे दर कमीच असले पाहिजे. आधीच कोरोनामुळे कामधंदा नाही, हातावरचे पोट असणाऱ्यांनी गॅस सिलिंडरसाठी एवढे पैसे मोजायचे कसे, बरं सिलिंडर न घेऊन पण चालत नाही, इकडे आड अन् तिकडे विहीर अशी स्थिती झाली आहे. गरिबांनी घर चालवायचं कसं याचा विचार शासनाने करायला पाहिजे.
लक्ष्मी मिराशी (गृहिणी)
--
आधीच इतकी महागाई वाढली आहे की, घर चालवताना कसरत होते. यापूर्वी गॅसवर अनुदान दिले जायचे, हे अनुदान गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे आणि दर महिन्याला नव्या वाढलेल्या दरानेच गॅस सिलिंडर घरात येतो. असे असेल तर अनुदान पुन्हा सुरू करावे.
दीपाली यादव (गृहिणी)
--
गॅसचे दर वाढवताना ३० ते ५० रुपयांनी वाढवायचे आणि १० रुपयांनी कमी करायचे हा काय प्रकार आहे. सव्वादोनशे रुपयांनी दरवाढ केल्यावर दहा रुपये कमी केले, या रुपयांत कोथिंबीर, कढीपत्ता देखील येत नाही. आधीच महागाईमुळे जीव मेटाकुटीस आला आहे. त्यात ही सवलत दिल्यानंतर दहा रुपयांत काय येतंय हे सरकारनेच सांगावं.
उषा पाटील (गृहिणी)