प्रकाश पाटील---कोपार्डे --साखर उत्पादनातील संभाव्य घटीचे चित्र निर्माण होताच साखरेचे दर ३७०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले असून, शासनाने यात सकारात्मक भूमिका ठेवली तर येत्या दोन महिन्यांत प्रतिक्विंटल हे दर ४५०० वर पोहोचतील, असे या उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. या दरवाढीने किमान महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ७०/३० फॉर्म्युल्याचा केंद्र शासनाचा निर्णय अमलात आणला तर आणखी १०० ते ३०० रुपये दर मिळणे सहज शक्य आहे.महाराष्ट्रासह देशात दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस शेतीवर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावर्षी महाराष्ट्रात केवळ १५० साखर कारखाने आपला गाळप हंगाम सुरू करू शकले आहेत. पैकी १२२ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम फेब्रुवारीच्या मध्यावरच गुंडाळले आहेत, तर ऊस गाळपात सव्वादोनशे लाख मे. टनांनी घट झाली आहे. याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. २५० लाख क्विंटल साखर उत्पादन कमी झाले असून, साखर टंचाई नसली तरी भविष्यात बाजारात साखर टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या एक्स फॅक्टरी साखरेचे दर ३७०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचल्याने साखर कारखान्यांना मागील दोन वर्षांतील आर्थिक तोटे भरून काढण्याबरोबर ऊस उत्पादकांना रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे ७०/३० च्या फॉर्म्युल्याने दर देण्यास बळकटी येईल असे चित्र आहे.कारखान्याचे सरासरी साखर उतारे १२ टक्क्यांपासून १२.५० टक्क्यांपर्यंत आहेत. याचा अर्थ एक टन उसापासून १२० किलो निव्वळ साखर मिळते. साखरेचा बाजारभाव ४५६० ते ४६८० पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. याचबरोबर मोलॅसिस, सहवीज प्रकल्प, बगॅस व डिस्टिलरी या उपउत्पादनातून मिळणारे एकत्रित ४०० ते ५०० रुपये उत्पन्न अंदाजे गृहीत धरल्यास एक टन उसापासून साखर कारखान्यांना किमान चार हजार ८०० ते पाच हजार २०० रुपये उत्पन्न मिळते. यातून साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च ८०० ते १३०० रुपये प्रतिटन वजा करता एक टन उसापासून साखर कारखान्यांना निव्वळ उत्पन्न ३८०० ते ४००० रुपये मिळत आहे. निव्वळ मिळणाऱ्या उत्पन्नातून साखर कारखान्यांना ३० टक्के व ऊस उत्पादकांना ७० टक्के रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार असा वाटा केल्यास ऊस उत्पादकांना प्रतिटन तीन हजार रुपये दर देणे आताच्या साखर दरामुळे शक्य आहे. महाराष्ट्रात काय, पण कोल्हापूर जिल्ह्याचा ऊसदराचा विचार केला तर एक-दोन कारखाने वगळता एकाही साखर कारखान्याचा ऊसदर २७०० रुपयांवर नाही. जर ७०/३० फॉर्म्युल्याची अंमलबजावणी झाली, तर सध्या साखर कारखान्यांना ३०० ते ४०० रुपये आणखी ऊस उत्पादकांना द्यावे लागणार आहेत.सहकारी साखर कारखाने हे ऊस उत्पादकांच्या हितासाठीच आहेत. ज्यावेळी साखरेला दर मिळतो, त्यावेळी तरी सकारात्मकता दाखवून ऊस उत्पादकांना उत्पादन खर्चाएवढा दर मिळेल, अशी भूमिका ठेवावी.- संजय पाटील, ऊस उत्पादक, वाकरे,
साखर दरवाढीने ७०/३० च्या फॉर्म्युल्यास बळकटी?
By admin | Updated: March 9, 2017 00:37 IST