कोल्हापूर : महापालिकेच्या आर्थिक चाव्या हातात असणाऱ्या स्थायी समितीवर सुभाष बुचडे, भूपाल शेटे, विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, अजित राऊत यांसारख्या दिग्गजांची बुधवारी वर्णी लागली. स्थायी सभापती होण्यास इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या संदीप कवाळे यांच्यासमोर अजित राऊत यांनी आव्हान उभे केल्याचे त्यातून स्पष्ट होत आहे.बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी, परिवहन तसेच महिला व बालकल्याण समितीवरील रिक्त झालेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
स्थायी समितीचे १६ सदस्य असून, त्यातील आठ सदस्य तर परिवहन समितीवर १२ सदस्य असून त्यातील सहा सदस्य निवृत्त झाले होते. महिला बाल कल्याण समितीवर नऊ सदस्य असून, बुधवारी या नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.स्थायी समिती सभापतिपद यंदा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे जाणार असून, या पक्षाकडून आधीपासूनच संदीप कवाळे यांचे नाव आघाडीवर आहे; मात्र बुधवारी अजित राऊत यांचे नाव अनपेक्षितपणे सदस्य म्हणून घालण्यात आल्याने त्यांचाही सभापती पदावर दावा असू शकतो. सभापतिपदाचा कोणाला मान मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.‘परिवहन’वर कार्यकर्त्यांना संधीपरिवहन समितीवर कॉँग्रेस, राष्ट्रवादी व ताराराणी आघाडीने कार्यकर्त्यांना अधिक संधी दिली आहे. यापूर्वी चंद्रकांत सूर्यवंशी (राष्ट्रवादी), सतीश लोळगे, संदीप सरनाईक (कॉँग्रेस), महेश वासुदेव (ताराराणी) यांना अशी संधी मिळाली आहे. आता त्यामध्ये यशवंत विलास शिंदे (कॉँग्रेस), प्रसाद रामचंद्र उगवे (राष्ट्रवादी ), नामदेव नागटिळे (ताराराणी) यांची भर पडली.शिवसेनेकडून प्रतिज्ञा उत्तुरे यांचे नाव आले असून, त्याच सभापती पदाच्या दावेदार मानल्या जात आहेत. सत्तेच्या वाटणीत परिवहन सभापतिपद हे शिवसेनेला देण्यात आले आहे.सभापती पदाच्या निवडी या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत.विविध समितींवर निवड झालेले सदस्य -स्थायी समिती -सुभाष बुचडे, जय पटकारे, भूपाल शेटे (कॉँग्रेस), अजित राऊत (राष्ट्रवादी ), सत्यजित कदम (ताराराणी), विजय सूर्यवंशी व विजयसिंह खाडे-पाटील (भाजप), नियाज खान (शिवसेना).परिवहन समिती- यशवंत विलास शिंदे (कॉँग्रेस), प्रसाद रामचंद्र उगवे (राष्ट्रवादी ), नामदेव नागटिळे व शेखर कुसाळे (ताराराणी), आशिष ढवळे (भाजप), प्रतिज्ञा उत्तुरे (शिवसेना).महिला व बाल कल्याण समिती - शोभा कवाळे, छाया पोवार, जयश्री चव्हाण (कॉँग्रेस), वहिदा सौदागर, मेघा पाटील (राष्ट्रवादी ), उमा इंगळे, भाग्यश्री शेटके (भाजप), स्मिता माने, रूपाराणी निकम (ताराराणी).
सभापती पदाचे दावेदार -
- स्थायी समिती - संदीप कवाळे किंवा अजित राऊत
- परिवहन समिती - प्रतिज्ञा उत्तुरे
- महिला बाल कल्याण समिती - शोभा कवाळे किंवा छाया पोवार