कोल्हापूर : हमाली वाढवून मिळावी यासाठी मंगळवारी सकाळी हमालांनी गुळाचे सौदे बंद पाडले. दुपारनंतर झालेल्या बैठकीतही हमाली वाढवण्याबाबतची चर्चा फिसकटली. त्यामुळे उद्याचे सौदे होणार की नाही याबद्दलही साशंकता आहे. गुळाचे सौदे झाल्यावर खरेदीदारांसाठी जो माल भरून द्यावा लागतो त्याचा ३० किलोच्या रव्याचा हमालीचा दर ६ रुपये ५७ पैसे आहे. त्यामध्ये ५० टक्के तीन वर्षांसाठी वाढ द्यावी, अशी मागणी आहे. यासंदर्भात आज, बुधवारी जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयात बैठक होणार आहे.सकाळपर्यंत बाजार समितीमध्ये पाच हजार गूळ रव्यांची आवक झाली होती. दहा वाजेपर्यंत तीन हजार गूळ रव्यांचे सौदे झाले होते. त्याचदरम्यान माथाडी कामगारांनी हमाली वाढवून द्यावी, अशी मागणी सुरू केली. आता अचानक या मागणीवर निर्णय कसा घेणार, असा प्रश्न उपस्थित करून व्यापारी आणि शेतकऱ्यांनीही हमालांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु एक एक करत सर्वच ठिकाणचे हमाल एकत्र आले आणि दीड तास त्यांनी माथाडी कार्यालयाबाहेर बैठक मारली. त्यामुळे दीड तास सौदे बंद राहिले.दुपारी बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी बैठक बोलावली. परंतु या बैठकीला सर्वजण न आल्याने दुपारी चार वाजता पुन्हा बैठक बोलावण्यात आले. या बैठकीत हमालांच्या प्रतिनिधींनी ५० टक्के दरवाढीची मागणी केली. एकदा दरवाढ केली की तीन वर्षे लागू होते. त्यामुळे इतकी वाढ एकदम कशी देणार, असा मुद्दा उपस्थित झाला. आधी साैदे सुरू करा. मग चर्चा करू असा प्रस्ताव देण्यात आला परंतु तो नाकारण्यात आला. त्यामुळे अनिश्चितेच्या वातावरणातच कोणताही निर्णय न होता ही बैठक संपली.तानाजी कुठं हायसर्व हमाल माथाडी कामगार कार्यालय परिसरात पायऱ्यांवर बसून होते. काहीजण आत बसले होते. एवढ्यात ‘तानाजी कुणाचे तरी गुळाचे रवे उतरायला लागलाय, ’असे सांगत एकजण आला. त्यावरून वातावरण तापायला सुरुवात झाली. ‘तानाजी कुठं हाय’ अशी विचारणा सुरू झाली. एवढ्यात समोरून तानाजीच आल्याने मग अनेकांनी त्याच्याकडे विचारणा सुरू झाली. अखेर ‘आपल्यात वाद नको’ असे सांगत हा वाद मिटवण्यात आला.
कोल्हापुरात हमालांनी बंद पाडले गुळाचे सौदे, बाजारपेठेवर परिणाम
By समीर देशपांडे | Published: January 03, 2023 4:57 PM