कागलमध्ये शेतकऱ्यांनीच हाती घेतले ऊसदराचे आंदोलन

By विश्वास पाटील | Published: November 15, 2023 03:18 PM2023-11-15T15:18:59+5:302023-11-15T15:19:42+5:30

धुरांडी धिम्या गतीनेच : सर्वच गटाचे कार्यकर्ते आंदोलनात

in kagal the farmers took up the sugarcane price agitation | कागलमध्ये शेतकऱ्यांनीच हाती घेतले ऊसदराचे आंदोलन

कागलमध्ये शेतकऱ्यांनीच हाती घेतले ऊसदराचे आंदोलन

दत्ता पाटील, कागल : ऊसदरावरुन सुरू असणाऱ्या आंदोलनाचे लोण राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातही पोहचले आहे. त्यामुळे येथील कारखाने सुरू होवून १५ दिवस उलटले तरीही धिम्या गतीनेच सुरू आहेत. तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रभाव कमी असला तरी आता आपल्या न्याय्य हक्कांसाठी राजकीय गट-तटाला तिलांजली देऊन शेतकरीच रस्त्यावर उतरले आहेत.

सध्या अपवाद वगळता शेतकरी आणि वाहनधारकांचे नुकसान होवू नये यासाठी समन्वय साधत शांततेच्या मार्गानेच आंदोलन सुरू आहे.माञ, राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या तालुक्यातही चळवळीला बळ मिळतयं ही बाब अधोरेखित करणारीच आहे. तालुक्यातील अनेक गावात शेतकरी संघटनेच्या शाखाही स्थापन झाल्या आहेत. कागल तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी अनेक दिवसांपासून जिल्ह्यावर अधिराज्य गाजवले आहे.त्यामुळे येथे गट तटाला अधिक महत्त्व आहे.परंतु, राजकीय सत्तेसाठी नेते मंडळींकडूनच सोयीचे राजकारण केले जात आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांसह जनतेमध्येही आपल्या हिताचा विचार पुढे येताना दिसत आहे.

मागील वर्षीच्या ऊसाला ४००रु. व यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ३हजार५०० रु भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांच्या पदयाञेला कागल तालुक्यातही अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून महिनाभर येथील शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यासह शेतकरीही ऊसतोड बंद करण्यासाठी प्रबोधन करत आहेत.

दरम्यान, कागलमधील छञपती शाहू, हमिदवाडा,बिद्री यांनी पंधरा दिवसापुर्वी तर अन्नपूर्णा शुगरने महिन्यांपूर्वी धुरांडी पेटविली आहेत. माञ, आंदोलनामुळे सर्वच कारखान्यांचे गाळप धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र आहे.

रात्रीचा दिवस...

ऊसाला दरवाढ मिळाली तर ती केवळ आंदोलन करणाऱ्यांनाच मिळणार नाही. तर ती सर्वांनाच मिळणार आहे... चार दिवस संयम ठेवा... असे प्रबोधन करत मोटररँलीसह येथील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काही जण राञीची चुप्पी ऊसवाहतुक करत आहेत. त्यामुळे मुख्य मार्गावर कार्यकर्ते पहारा देवून राञी जागवत आहेत.

गुरुंनंतर आता शिष्यांकडून अपेक्षा...

२०१३ च्या हंगामात स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन ऊसदराची कोंडी फोडली होती. तर सध्या त्यांचेच राजकीय शिष्य हसन मुश्रीफ हे पालकमंत्री आहेत. आता त्यांनीच यामध्ये समन्वयाची भूमिका घेवून तोडगा काढावा अशी मागणीही शेतकऱ्यातून होत आहे.

कारखानदारांची अशीही गोची..

कधी नाही इतक्या मोठ्या प्रमाणात कागलमधील शेतकरी स्वयंस्फूर्तीने ऊसदराच्या आंदोलनात रस्त्यावर उतरला आहे. अनेक गावात ऊसदराचा तिढा सुटेपर्यंत ऊसतोड न घेण्याचा ठरावही करुन कारखानदारांची गोची केली जात आहे. त्यामुळे राजकीय मंडळींना यातुन बोध घ्यावा लागणार आहे.

मुरगुडमधील सभेकडे नजरा...

राजू शेट्टी पंधरावडयात दुसऱ्यांदा कागल तालुक्यात येत आहेत. त्यामुळे येथील आंदोलनाची धार तीव्र होत आहे. वाढत्या खर्चामुळे शेती आतबट्ट्याची झाली आहे. त्यामुळे शेट्टी यांनी मुरगुड मधील सभेत चितावणी दिली तर येथील तरुण आक्रमक होवून आंदोलन तीव्र करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे येथील जाणकारांतून बोलले जात आहे.

Web Title: in kagal the farmers took up the sugarcane price agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kagal-acकागल