लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीमध्ये असणारा शिपुगडे तालीम (प्रभाग क्रमांक २९) मध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी मातब्बर उमेदवारांमध्ये ‘कुस्ती’ रंगणार आहे. सर्वसाधारण (खुला) प्रभाग झाल्याने इच्छुकांची भाऊगर्दी आहे. शेजारील तीन प्रभाग आरक्षित झाल्याने तेथीलही उमेदवारांनी या प्रभागातून फिल्डिंग लावली असल्याने सध्याच्या घडीला तब्बल १३ जणांच्या नावांची चर्चा आहे.
महापालिकेच्या गत निवडणुकीमध्ये शिपुगडे तालीम प्रभागात कांटे की टक्कर झाली होती. राष्ट्रवादीच्या सरिता नंदकुमार मोरे यांना १४६१, तर भाजप, ताराराणी आघाडीच्या पवित्रा संदीप देसाई यांना १४५६ मते मिळाली. यामध्ये केवळ ५ मताने देसाई यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे देसाई यांच्या घरातील मते सिद्धार्थनगर प्रभागात होती. या निकालाची चर्चा बरेच दिवस सुरु होती. शिवसेनेच्या अमृता धनंजय सावंत यांनाही १२१९ मते मिळाली. सरिता मोरे यांनी महापौरपदही भूषवले.
यंदाच्या निवडणुकीमध्ये हा प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी झ्राला असल्याने १३ जण येथून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. यामध्ये विद्यमान नगरसेविका सरिता मोरे यांचे पती माजी नगरसेवक नंदकुमार मोरे आजपर्यंत केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा रिंगणात आहेत. ते राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मोरे कुटुंबातून आतापर्यंत सुभाष मोरे, नंदकुमार मोरे आणि सरिता मोरे यांनी महापालिकेत प्रतिनिधीत्व केले आहे. माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनीही पुन्हा महापालिकेत एंट्री करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांची छायचित्रे असणारे फलकही प्रभागात झळकवले आहेत. शेजारील प्रभागातील माजी नगरसेवक अफजल पिरजादे यांनीही या प्रभागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत माजी नगरसेवक धनंजय सावंत, नागेश घोरपडे, संदीप देसाई, रमेश दिवेकर, नीलेश बन्ने, राहुल घाटगे, रोहित फराकटे, अभिजित वंडकर, मंगेश परीट, अभिजित बुकशेट यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. संदीप देसाई १० जानेवारी रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
चौक़ट
क्षीरसागर यांच्यासमोर धर्मसंकट
शिपुगडे तालीम प्रभागातील तीन ते चार इच्छुकांनी स्वत:च्या पक्षाचा विचार न करता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रचार केला होता. आता क्षीरसागर यांच्यासमोर धर्मसंकट आहे. या प्रभागातून शिवसेनेची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
चौकट
गत निवडणुकीतील चित्र
सरिता मोरे (राष्ट्रवादी) १४६१ मते
पवित्रा देसाई (भाजप) १४५६
अमृता सावंत (भाजप) १२१९
पद्मावती घाटगे (अपक्ष) १४८
प्रतिक्रिया
पाच वर्षात तब्बल ६ कोटी ७२ लाखांची विकासकामे प्रभागात केली आहेत. पाणी, ड्रेनेजलाईन, चॅनेलसोबत ४० टक्के गटारींची कामे झाली आहेत. महापौरपदी असताना नर्सरी बागेतील शाहू समाधी स्थळासाठी ८० लाखांचा निधी विशेष बाब म्हणून मंजूर केला. स्मारकाच्या अडचणी दूर करण्यासाठी अथक् प्रयत्न केले. शिल्लक ३५ टक्के गटारीची कामे पूर्ण करणे, भास्करराव जाधव वाचनालयाची शाखा दादासोा हळदकर हॉल येथे सुरू करण्याचा मानस आहे.
सरिता मोरे, विद्यमान नगरसेविका
चौकट
प्रभागात झालेली विकासकामे
शाहू प्राथमिक विद्यालयाचे नूतनीकरण
पद्माराजे विद्यालय परिसरात कुटुंबकल्याण केंद्राच्या इमारतीची उभारणी
संपूर्ण प्रभागात एलईडी दिवे
चार प्रमुख चौकात हाय मास्ट दिवे
पंचगंगा हॉस्पिटल ते जामदार क्लब रस्त्यासाठी २३ लाख मंजूर
कोकणे मठ परिसरात महिलांसाठी ओपन जिम
गायकवाड पुतळा सुशोभिकरण
दादासाहेब हळदकर हॉलचे नूतनीकरण
चौकट
प्रभागातील प्रमुख समस्या
प्रभागात अरुंद रस्ते असल्यामुळे चारचाकी वाहने पार्किंगची समस्या
काही ठिकाणची गटारींची दुरवस्था
पंचगंगा हॉस्पिटल ते गायकवाड पुतळा परिसरातील रस्ता अनेक वर्षांपासून खराब
फोटो : ०४०१२०२० कोल केएमसी शिपुगडे तालीम
ओळी :
कोल्हापुरातील शिपुगडे तालीम प्रभागामधील पंचगंगा हॉस्पिटल ते गायकवाड पुतळा येथील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.