कोल्हापूर : अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी (रविवारी) काही मंडळाच्या मिरवणुका निघाल्या. त्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्या. छत्रपती शिवाजी तरुण मंडळाची महागणपतीची पारंपरिक मिरवणूक सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी झाली. विधिवत पद्धतीने इराणी खणीत मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या मार्गावरील २०हून अधिक मूर्तीचे विसर्जन रात्रीपर्यंत झाले.शिवाजी चौकातील महागणपतीचे विसर्जन भावपूर्ण वातावरणात पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तिमय मंत्रोच्चारात बाप्पाला निरोप देण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' या जयघोषाने उत्सव संपला. शाहू गर्जना या ढोल ताशा पथकाने उपस्थितांची मने जिंकली. छत्रपती शिवाजी चौक, पानलाइन, गंगावेश, रंकाळा स्टँण्ड, रंकाळा टॉवर, जुना वाशी नाका मार्गे मूर्ती इराणी खण येथे आली. त्या ठिकाणी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत रात्री मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.फिरंगाई तालीम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुख्य महाव्दार रोडवरून मिरवणूक काढली. डीजेच्या ठेक्यावर कार्यकर्ते थरकले. मिरवणुकीत २१ फुटी द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि फिरते सुदर्शन चक्र, नृसिंह-वीर हनुमान यांच्या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले. संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळाची २१ फुटी गणेशमूर्तीचे विसर्जन झाले. मंडळाच्या कार्यकर्त्यांना ढोल, ताशांचा गजर केला.
वाहतूक विस्कळीतपापाची तिकटी ते इराणी खणीपर्यंत रविवारीही वाहतूक विस्कळीत झाली. मंडळाचे गणपती मुख्य मार्गावरून पुढे सरकत होते. त्या वेळी हा रोड वाहतुकीसाठी खुला केला. मात्र मंडळाचे गणपती दाखल झाल्यानंतर वाहतूक मार्गावर कोंडी निर्माण झाली.