कोल्हापूर : अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह अन्य मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी, ३० जुलैला या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात बैठक घेऊ, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.सध्या रेल्वेच्या प्रवासी दरात साडेचौदा टक्के व मालवाहतूक दरात साडेसहा टक्के भाडेवाढ केली आहे. त्याचबरोबर केंद्र शासनाने अर्थसंकल्प जाहीर केला आहे. त्यामध्ये महागाईचा दृष्टिकोन दिसून येत आहे. अन्नसुरक्षेच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे; परंतु केशरी कार्डावर एक, दोन व तीन रुपयांत मिळणाऱ्या धान्याची सवलत अनेक केशरी कार्डधारकांना मिळत नाहीत, त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर अशा ६० वर्षांवरील असंघटितांच्या पेन्शनबाबत मिळावी, या मागणीसाठी टाऊन हॉल बाग येथून ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.यावेळी गोविंद पानसरे म्हणाले, केंद्रातील सत्ताधारी भाजप तसेच काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडी या सरकारने जनतेची फसवणूक केली. भाजप सरकार हे भांडवलदारांचे आहे. त्यामुळे निवडणुकीत पैशांचे आमिष दाखवणाऱ्यांना धुडकावून लावा.नामदेव गावडे म्हणाले, केंद्रातील सरकारने दीड महिन्यांतच इंधन व रेल्वे दरवाढ केली. त्यामुळे हे सरकार भांडवलदारांचे हित जपणारे आहे. यावेळी सुशीला यादव, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे आदींची भाषणे झाली. मोर्चात बाळासाहेब बर्गे, सतीशचंद्र कांबळे, ए. बी. जाधव, शिवाजी शिंदे, महादेव आवटे, दिनकर सूर्यवंशी, रत्नाकर तोरसे, महादेव पडवळ आदी सहभागी होते.
अन्नसुरक्षा कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करा
By admin | Updated: July 22, 2014 00:40 IST