इचलकरंजी : येथील सांगली नाका ते शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्यामुळे वारंवार छोटे-मोठे अपघात होत आहेत. हा रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी आज, शुक्रवारी दुपारी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन केले. नगरसेवक व प्रशासन अधिकारी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन आठवड्यात रस्ता करण्याचे आश्वासन दिले.शहरातील अनेक रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचल्यामुळे अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्याचबरोबर यामुळे छोटे-मोठे अपघातही वारंवार होत आहेत. खड्ड्यातून गाडी गेल्यानंतर बाजूने जाणाऱ्या वाहनधारकांवर व पादचाऱ्यांच्या अंगावर डबक्यातील खराब पाणी उडाल्याने वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. शहापूर गावचावडी ते सांगली नाका हा रस्ता तर अत्यंत खराब झाला आहे. त्यामुळे या परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आज रास्ता रोको आंदोलन केले.यावेळी भागातील नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष रणजित जाधव, प्रधान माळी, दादा भाटले यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलनकर्त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतर नगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन ठोस आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रहिम सोलापुरे, युवा मोर्चाचे सतीश पंडित, दीपक पाटील, अनिल मुधाळकर, शशी मोहिते, कल्पना गायकवाड, विलास पाटील, आदींसह कार्यकर्ते व परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत शहापूर मार्गावर ‘रास्ता रोको’
By admin | Updated: August 9, 2014 00:30 IST