लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पडणा-या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून, पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे पंचगंगा नदी बंधारा पाण्याखाली गेला आहे. गुरुवारी (दि.१७) दुपारी चार वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी ५३ फुटांवर होती, तर शुक्रवारी सायंकाळी सातपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी ६० फुटांवर पोहोचली आहे.
शहरात पावसाने उसंत घेतली असली तरी धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. पंचगंगेची इशारा पातळी ६८ फुटांवर असून, ७१ फुटांवर धोका पातळी आहे. या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम असून यावर्षी पहिल्याच टप्प्यात पंचगंगा पात्राबाहेर पडली आहे. पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाने गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. त्याचबरोबर प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली असून, यांत्रिक बोट, अग्निशामक दल आणि कर्मचारी तैनात केले आहेत.
दरम्यान नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीतीरी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. तसेच आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवत आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना केल्या. यावेळी पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरअभियंता संजय बागडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख संजय कांबळे, अग्निशमन दल व रेस्क्यू फोर्सचे जवान व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळी
१८०६२०२१-आयसीएच-०४
इचलकरंजीत जुन्या पुलाला पाणी घासत आहे. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
छाया-उत्तम पाटील