इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना मुभा दिली आहे. असे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश करण्याच्या नादात येथील शहरातील पोलीस यंत्रणेने अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनी पास दाखवूनही त्यांच्यावर कारवाई केली आहे. याबाबत अत्यावश्यक सेवेतून काम करणाऱ्या नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी शनिवारी (दि. ८) पोलिसांनी १६० मोटारसायकलींवर कारवाई केली. या कारवाईमध्ये अत्यावश्यक सेवेतील पेपर विक्रेते, मेडिकल, रुग्णालय अशा विविध घटकांतील नागरिकांवर कारवाई केली. रविवारी याबाबत शहर वाहतूक शाखेजवळ नागरिकांनी जप्त केलेल्या मोटारसायकली परत देण्यासंदर्भात विनंती केली.
दरम्यान, शनिवारी अनेक नागरिकांनी अत्यावश्यक सेवेतील ओळखपत्र दाखविले. तरीही पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत कोणाचे काहीही न ऐकता मोटारसायकलींवर कारवाई केली. याबाबत रविवारी जाब विचारला असता वाहतूक शाखेच्या परिसरात नागरिकांना न थांबण्याचे आवाहन केले जात आहे; अन्यथा कारवाई करणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
चौकट ५०० रुपये दंड; कच्ची पावती
विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडून मोटारसायकली जप्त केल्या जात आहेत. जप्त केलेली मोटारसायकल परत देताना त्यांच्याकडून ५०० रुपये दंड आकारला जात असून, त्यांना २०० रुपयांची कच्ची पावती दिली जात आहे. याबाबत एका संघटनेने पोलिसांना जाब विचारला असता त्यांना उडवाउडवीची देण्यात आली आणि हा वाद मिटविला.