इचलकरंजी : येथील नगरपालिकेने अनेक ठेकेदारांची अंदाजे ३५ कोटी रुपयांची देणी देणे बाकी आहे. तरीसुद्धा नव्याने साडेसात कोटी रकमेच्या निविदा काढण्याचा विषय स्थायी समितीच्या सभेत मंजुरीसाठी घेतला आहे. त्यामुळे पालिका आर्थिक संकटात असताना असा निर्णय घेऊ नये, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शशांक बावचकर यांनी नगराध्यक्षा अलका स्वामी यांना दिले.
निवेदनात, नगरपालिकेने आज, शुक्रवारी स्थायी समितीची सभा बोलवली आहे. या सभेत विविध कामांच्या अंदाजपत्रक मंजुरीचा विषय विषयपत्रिकेवर घेतला आहे. या सर्वांची एकूण अंदाजपत्रकीय रक्कम ७.५० कोटी आहे. मात्र, पालिकेची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता इतकी मोठी रक्कम पालिका देऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित होतो. जिल्हाधिकारी यांनी सन २०२१-२२ चे अंदाजपत्रक मंजूर करताना प्रथम मार्च २०२१ अखेरची देयके प्रथम द्यावीत. त्यानंतर उर्वरित रकमेसाठी कामाची निविदा मागवावी, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समिती सभेतील विषय क्र. २ तूर्तास स्थगित करावे, असे म्हटले आहे.