गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होते आहे. गेल्या आठवडाभरापासून येथील पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. शुक्रवारी (ता.२८) पेट्रोलचा दर ९९.९२ इतका होता. यात २४ पैशांची दरवाढ झाल्याने हा दर शंभर रुपये १६ पैसे इतका झाला असून डिझेल देखील ९० रुपये ७६ पैसे इतके झाले आहे. सध्या कोरोना महामारी, जीवनावश्यक वस्तूची भाववाढ, महागाई यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. अशातच पेट्रोलने शंभरी पार केल्यामुळे शहरवासीयांना महिन्याभराच्या खर्चाचा ताळमेळ कसा घालायचा याची चिंता लागून राहिली आहे.
चौकट
दरवाढीमुळे वस्त्रोद्योगावर परिणाम
कठीण काळातही यंत्रमागधारक उद्योगाला सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यंत्रमाग व्यवसायामुळे शहरात अंतर्गत मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. पेट्रोल-डिझेलचे भाव वाढल्याने त्याचा थेट वस्त्रोद्योग व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांना त्याची चिंता लागून राहिली आहे.