इचलकरंजी : गॅस गळतीमुळे शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत घरातील संपूर्ण प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना येथील लायकर मळा परिसरात सोमवारी सकाळी घडली. याची नोंद शिवाजीनगर पोलिसांत झाली आहे. याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येथील लायकर मळा परिसरात राधाकृष्ण सायझिंगच्या पिछाडीस सूरज अशोक माने हे राहण्यास असून, त्यांचे पत्र्याचे शेड आहे, तर शेडची एक खोली त्यांनी प्रमोद शंकर पाटील यांना भाड्याने दिली आहे. माने यांचा चिकन-६५चा व्यवसाय आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास माने यांच्या घरात गॅस गळती होऊन शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे आग लागली. अत्यंत लहान खोल्या असल्याने आगीने क्षणार्धात पेट घेतला आणि बघता-बघता माने यांच्यासह पाटील यांच्या घरातील प्रापंचिक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये टीव्ही, फ्रीज यासह अन्य प्रापंचिक साहित्य जळाले. या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, तर भागातील नागरिकांनीही उरले-सुरले साहित्य बाहेर काढण्यासाठी मदत केली. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. (वार्ताहर)
इचलकरंजीत घरास शॉर्टसर्किटने आग
By admin | Updated: August 18, 2015 01:02 IST