विश्वास पाटील ल्ल कोल्हापूरमहाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीपूर्वी आकारास आलेल्या पाच पक्षांच्या महायुतीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्याचा महायुतीला चांगलाच दणका बसणार आहे. जागा वाटपांबाबत एक सप्टेंबरपर्यंत काय घडते, हे पाहून त्यासंबंधीचा निर्णय घेण्याचा शेट्टी यांचा विचार असल्याचे त्यांच्या पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. शिवसेना खासदार शेट्टी यांना विधानसभेच्या अवघ्या चार ते पाचच जागा सोडायला तयार आहे. शेट्टी यांनी ३८ उमेदवारांची यादीच महायुतीला दिली आहे. त्यात पुढे-मागे होण्याची त्यांची तयारी आहे; परंतु चार-दोन जागा देणार असाल, तर मग कशाला महायुती, असा संघटनेचा सवाल आहे. त्यातून मुख्यत: शेट्टी व शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भाजप त्याकडे नुसते लांबून पाहत आहे. महायुतीला आम्ही लोढणे वाटत असेल तर त्यांनी तसे सांगावे, आमचा मार्ग मोकळा असल्याचे शेट्टी यांनी जुलैमध्येच स्पष्ट केले आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४२ जागांवर दणदणीत विजय मिळाला. त्यामध्ये खासदार शेट्टी यांची जागाही शिवसेनेच्याच कोट्यातील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलची लाट निर्माण झाल्यावर हा एकतर्फी निकाल लागला. त्यामुळे विधानसभेला शिवसेना-भाजप हे घटक पक्ष स्वाभिमानीसह रासप व रिपब्लिकन पक्षाच्या आठवले यांना फारसे बेरजेतच धरायला तयार नाहीत. कमी जागा देऊन अपमान करायचा व स्वाभिमानीने आदळआपट करून स्वत:च बाहेर पडावे, असे शिवसेनेचे धोरण दिसत असल्याची संघटनेची तक्रार आहे. शिवसेना नेते रामदास आठवले यांनीही निवडून येण्याच्या क्षमतेवर जागा वाटप होईल. ते संघटनेला मान्य नसेल, तर खासदार शेट्टी यांनी महायुतीत राहायचे की नाही, हे ठरवावे असे काल, शुक्रवारीच मुंबईत जाहीर केले आहे. त्यामुळे संघटनेतील अस्वस्थताही वाढली आहे.शिवसेना संघटनेला कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त शिरोळ व चंदगड या दोनच जागा सोडायला तयार आहे. या दोन जागा संघटनेच्या हक्काच्याच आहेत. त्याबाबत ‘माळावर शंख करायला पाटलांची परवानगी कशाला लागते.’ अशी संघटनेची भूमिका आहे. शेट्टी स्वत: खासदार आहेत व लोकसभेला किमान दहा विधानसभा मतदारसंघात त्यांना व सदाभाऊ खोत यांना मताधिक्क्य मिळाले आहे. लढाऊ कार्यकर्त्यांची फौज हे संघटनेचे बलस्थान आहे. त्यामुळे राज्यातील चार-पाच जागा मिळणार असतील तर त्यापेक्षा स्वतंत्र लढलेले बरे, असा संघटनेचा पवित्रा आहे. त्यादृष्टीने शेट्टी यांनी चाचपणीही सुरू केली आहे. जागा वाटपात सन्मानजनक तोडगा निघाला नाही, तर स्वबळावर लढण्याची संघटनेची तयारी आहे. ऊस आंदोलनातील यशामुळे दक्षिण महाराष्ट्रातील सहा-सात जिल्ह्यांत प्रत्येक मतदारसंघात संघटनेला मानणारा वर्ग तयार झाला आहे. त्यांची निवडून येण्याची क्षमता नसली, तरी त्या मतदारसंघात कुणाचा पराभव करायचा हे ठरविण्याइतकी संघटनेची ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेमागून फरफटत जाण्यापेक्षा स्वबळावर लढल्यास दोन्ही काँग्रेसमधील नाराजांचाही पाठिंबा मिळू शकतो, असा संघटनेचा होरा आहे.संघटनेची ‘ताकद’ काय...भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी महायुतीत या, असे जाहीर निमंत्रण दिल्याने मी त्यामध्ये सहभागी झालो आहे. त्यामुळे महायुतीला आता जर आम्ही नको असेल, तर त्यांनी तसे स्पष्टपणे सांगावे. जबरदस्तीने कुणाच्या गळ्यात पडण्याचा आमचा स्वभाव नाही. संघटनेची आतापर्यंतची सगळी वाटचाल स्वबळावर झाली आहे, हे आमची ताकद विचारणाऱ्यांनी विसरू नये.- खासदार राजू शेट्टीअध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना४राष्ट्रवादी काँग्रेसवर आक्रमक हल्ला४शेट्टी यांचे स्वच्छ चारित्र्य४लढाऊ कार्यकर्ते४ऊस आंदोलनातील यश४ग्रामीण प्रश्नांची चांगली जाण४मुंडे यांच्या निधनानंतर महायुतीकडे शेट्टी यांच्याशिवाय ग्रामीण भागात प्रभाव असलेला नेता नाही.
शेट्टींची ‘महायुती’ला सुटी?
By admin | Updated: August 24, 2014 00:48 IST