कोल्हापूर : श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे विहान संस्थेतील १०० एच. आय. व्ही. ग्रस्त मुलांना पोषण आहाराचे वाटप काल, गुरुवारी करण्यात आले. एच. आय. व्ही. ग्रस्त मुलांना आरोग्य आणि शिक्षणविषयक मदत करण्याचे काम विहान काळजी केंद्र करते. ‘विहान’च्या या कार्याची दखल घेत महालक्ष्मी अन्नछत्राने या निष्पाप लेकरांना पोषण आहार देण्याची व्यवस्था केली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात शाहू स्मारक भवनाच्या मिनी सभागृहात एडस् नियंत्रण जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, महालक्ष्मी अन्नछत्राचे अध्यक्ष राजू मेवेकरी, महाभारत कन्स्ट्रक्शनचे जयेश कदम, संजय देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोषण आहाराचे वाटप झाले.एच. आय. व्ही. ग्रस्तांनी २००४ मध्ये या विहान संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेकडे कोल्हापूर जिल्ह्यातील ४३० एच. आय. व्ही.बाधित मुलांची नोंदणी असून बहुतेकजण सहा ते १६ या वयोगटांतील आहेत. दैनंदिन औषधांसोबत पोषण आहाराचीही या मुलांना गरज आहे. समाजातील अनेक घटकांकडून या मुलांना पोषण आहार देण्यात येत आहे. सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या महालक्ष्मी अन्नछत्रानेही या संस्थेच्या १०० मुलांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारली आहे. जिल्हा एडस् नियंत्रण कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर म्हणाल्या, एच. आय. व्ही. ग्रस्तांना झालेल्या मुलांना एडस् होण्याचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत ११ टक्क्यांवर आले आहे़; पण आजही या रुग्णांकडे हीन भावनेने पाहिले जाते. डॉक्टरसुद्धा याला अपवाद नाहीत. या रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थांना सरकारकडून मिळणारा पैसा कमी पडतो. त्यामुळे या रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थांना साहाय्य करण्यासाठी आता सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.‘विहान’च्या अध्यक्षा सुनीता पाटील म्हणाल्या, एचआयव्हीने ग्रासलेल्या रुग्णांचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हावा, त्यांनी आत्महत्येसारख्या मार्गाचा अवलंब करू नये, यासाठी या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून पीडित मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना पोषण आहार देण्याबरोबरच त्यांच्या शिक्षणासाठीही प्रयत्न केले जातात. जयेश कदम यांनी ‘विहान’ला नेहमीच मदतीची, तर राजू मेवेकरी यांनी मुलांच्या पोषण आहारात खंड पडू न देण्याची ग्वाही दिली़ समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संजय जोशी, राजेश सुगंधी, शरद कार्किडे, प्रशांत तहसीलदार, पिंटू मेवेकरी, गिरीश कुलकर्णी, अतुल शिंगारे, तन्मय मेवेकरी, विराज कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांना प्रेमाचा घास
By admin | Updated: November 28, 2014 23:46 IST