शिरोळ : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या दत्तवाड जिल्हा परिषद व दानोळी पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत इच्छुक असणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
शिरोळ तालुक्यातील दत्तवाड जिल्हा परिषद व दानोळी पंचायत समिती या दोन जागा रिक्त आहेत. जि. प. सदस्य प्रवीण माने व पं. स. सदस्य सुरेश कांबळे यांचे निधन झाल्याने जागा रिक्त असल्यातरी पुढील वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वी, पोटनिवडणुका कधी होणार याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, राज्यातील काही जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी अपेक्षा असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोटनिवडणुकांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे. ऑगस्टपर्यंत निवडणुका झाल्या नाही तर या जागा रिक्तच राहतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीवर विरजण पडले आहे.