देवाळे : पन्हाळा तालुक्यातील सातवे येथे अपघातात मृत्यू झालेल्या सुनील रघुनाथ पाटील यांच्या वारसास युनियन बँक ऑफ इंडिया, सातवे शाखेच्या वतीने एटीएम विमा योजनेतून दोन लाख रुपये मदत सुपुर्द केली.
सातवे येथील तरुण सुनील रघुनाथ पाटील (वय ३०) याचा ६ डिसेंबर रोजी मोटारसायकल घसरून अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले असून दोन बहिणी व आई असा परिवार आहे. सुनीलचा कोणताही विमा नव्हता; परंतु युनियन बँकेच्या खात्याचे एटीएम कार्ड होते. या बँकेच्या शाखाधिकारी वैशाली दाते, उपशाखाधिकारी सुनीता यडाची यांनी एटीएम कार्ड असलेल्या अपघाती विमा योजनेतून सुनीलची आई शारदा रघुनाथ पाटील यांच्याकडे दोन लाख रुपयांची विमा रक्कम सुपुर्द केली. यावेळी माजी उपसरपंच माणिक पाटील, बँकेचे कर्मचारी व ग्राहक उपस्थित होते.
फोटो ओळ : सातवे (ता. पन्हाळा) येथील अपघात झालेल्या वारसाच्या कुटुंबीयांना विम्याचा धनादेश शाखाधिकारी वैशाली दाते यांनी दिला.
(छाया : संजय पाटील)