‘गोकुळ’ बचावच्या माध्यमातून दूध दरवाढीसह पशुखाद्य दरवाढीला विरोधासाठी मोर्चे व मल्टिस्टेटचा संघर्ष या सगळ्या पातळीवर माजी आमदार चंद्रदीप नरके अग्रभागी राहिले. राजकीय नफ्या-तोट्याची पर्वा न करता नरके यांनी मल्टिस्टेटच्या लढ्यात झोकून देऊन ते रद्द तर केलेच, पण ‘गोकुळ’मध्ये सत्तांतर होईपर्यंत प्रस्थापितांची पाठ सोडली नाही. त्यामुळेच सामान्य दूध उत्पादक ‘गोकुळ’च्या परिवर्तनाचे ‘किमयागार’ म्हणून चंद्रदीप नरके यांच्याकडे पाहतो....
चंद्रदीप नरके यांच्या अंगातच लढवय्येपणा आहे. शालेय जीवनापासूनच त्यांनी राजकारण आणि समाजकारणात भाग घेतला. स्वर्गीय डी. सी. नरके यांच्या विचाराचा वारसा पुढे चालवत असताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच त्यांनी काम केले. कुंभी कासारी साखर कारखाना, कुंभी कासारी सहकारी बँक, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी करवीर, पन्हाळा तालुक्यातील सामान्य माणसाला उभे करण्याचे काम केले. या कामाच्या शिदाेरीवरच त्यांना दहा वर्षे आमदार म्हणून काम करण्याची जनतेने संधी दिली. दहा वर्षे आमदार असूनही कधीही आमदारकीची हवा डोक्यात जाऊ दिली नाही. सामान्य माणसाच्या सुखदु:खात पुढे राहिलेच त्याशिवाय विकास कामे कशी खेचून आणायची, हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे आहे. किंबहुना विकास काय असतो, हे त्यांच्यामुळेच करवीरच्या जनतेला कळाले. दहा वर्षात मतदारसंघात कामाचा डोंगर उभा होता, महापुरात त्यांनी केलेले काम करवीरचीच काय जिल्ह्यातील जनता विसरू शकत नव्हती. मात्र दुसऱ्या बाजूला २०१९ मध्ये मतदारसंघात राजकीय परिस्थितीच अशी विचित्र तयार झाली, की सगळे नरके यांच्या विरोधात एकत्र झाले. ‘गोकुळ’ मल्टिस्टेट विरोधात उभ्या केलेल्या लढ्याने बडे नेते दुखावले होते. पारंपरिक विरोधकांना त्यांची साथ मिळालीच मात्र ज्यांच्यासोबत मल्टिस्टेटचा संघर्ष उभा केला, त्यांनीही ‘हात’ सोडला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून चंद्रदीप नरके यांना सगळ्यांनी घेरल्याने विधानसभेला त्यांचा पराभव झाला.
नरके घराणे हे खिलाडू वृत्तीचे आहे. विजयाने कधी हुरळून गेले नाही आणि पराभवाने कधी खचले नाही. पराभवाच्या दुसऱ्या दिवसापासून ते जनतेच्या संपर्कात राहिले. सुखदु:खात जनतेला आधार देण्याबरोबर शासन स्तरावरील सामान्य माणसांच्या कामासाठी ते आजही अहाेरात्र झटत आहेत. ‘गोकुळ’ मल्टिस्टेटचा त्यांना विधानसभेला फायदा होण्याऐवजी तोटाच झाला. तरीही त्यांनी प्रस्थापितांविरोधातील लढाई सोडली नाही. दूध उत्पादकांसाठी नातेसंबंध बाजूला ठेवून रस्त्यावरील संघर्ष सुरूच ठेवला. ‘गोकुळ’ दूध उत्पादकांच्या मालकीचा राहिला पाहिजे, या भावनेतून विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीच्या मोट बांधणीत ते पुढे होते. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह इतर नेत्यांनी विधानसभेला काय केले, हे न पाहता दूध उत्पादकांचे हित समोर ठेवून आघाडी बळकटीसाठी सर्व प्रकारच्या जोडण्यामध्ये ते पुढे राहिले. प्रचारातही मंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी मल्टिस्टेटसह ‘गोकुळ’च्या कारभारावर आसूड ओढले. हा संघर्ष केला नसता तर आज खऱ्या सभासदांना मतदानाचा हक्क मिळाला नसता, हे पटवून देण्यात ते पुढे होते. एकीकडे दूध उत्पादक, ठरावधारकांचे मनपरिवर्तन करत असताना दुसऱ्या बाजूला आघाडी भक्कम करण्यासाठी बेरजेचे राजकारण करण्यातही ते पुढे होते. चंद्रदीप नरके यांनी मल्टिस्टेटच्या लढ्यापासून ‘गोकुळ’च्या मतदानापर्यंत घेतलेली आक्रमक भूमिका, त्यांना सर्वपक्षीय नेत्यांची मिळालेली साथ, यामुळेच ‘गोकुळ’मध्ये ऐतिहासिक सत्तांतर करण्यात विरोधी आघाडीला यश आले.
नरके यांच्यामुळेच काठावरील प्रवाहात
‘गोकुळ’मध्ये सत्तांतर घडवणे तितकेसे सोपे नव्हते. ठरावांच्या संख्येवर विजयाचे गणित असल्याने अनेक नेत्यांची सावध भूमिका होती. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सोबत कोण कोण राहणार यावरच पाठिंब्याचे गणित अनेकांचे होते. चंद्रदीप नरके यांनी परिणामाचा विचार न करता मंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांच्यासोबत आघाडीच्या बांधणीसाठी पुढे राहिले. त्यानंतरच काठावरील नेते आघाडीच्या प्रवाहात येण्यास सुरूवात झाली.
सामान्य कार्यकर्त्याला निवडून आणण्याचे कसब
‘गोकुळ’साठी पन्हाळ्यातून अजित नरके यांना उमेदवारी दिल्यानंतर करवीरमध्ये नरके गटाला जागा मिळणार नाही, असेच काहीसे वातावरण होते. विरोधी आघाडीतील नेत्यांची संख्या पाहता, तसे वाटणेही योग्य होते. मात्र सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यायची, हे ठरवूनच त्यांनी प्रयत्न सुरू केले. अनेकजण इच्छुक होते, सगळेच कार्यकर्ते जवळचे असल्याने निवड करणे अडचणीचे होते. तरीही एस. आर. पाटील यांना उमेदवारी दिली. नुसती उमेदवारी दिली नाहीतर त्यांना निवडून आणण्यासाठी सगळी ताकद पणास लावली.
नरके गटाला उभारी देणारा विजयी
जिल्हा परिषद निवडणुकीत अजित नरके यांचा आणि त्यापाठोपाठ विधानसभेला चंद्रदीप नरके यांचा झालेल्या पराभवाने करवीर व पन्हाळा तालुक्यातील नरके गटात काहीशी मरगळ आली होती. मात्र ‘गोकुळ’मधील विजयाने गटाला उभारी मिळाली असून २०२४ च्या तयारीसाठी बळ मिळाले आहे. या पदांच्या माध्यमातून मतदारसंघात संपर्क मोहीम गतिमान करण्यास मदत होणार आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीत विधानसभेची पेरणी
‘गोकुळ’च्या निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघात नवीन समीकरणे आकारास आली. किंबहुना या निवडणुकीत आगामी विधानसभेची पेरणीच केली आहे. ही समीकरणे जिल्ह्यातील सर्वच सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थात कायम राहणार आहेत. त्यामुळे भविष्यात करवीरमध्ये वेगळे राजकीय धुव्रीकरण पहावयास मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.
- मच्छिंद्र मगदूम (सांगरूळ, वार्ताहर)