हातकणंगले तालुक्यातील कुंभोज परिसरात वादळी वाऱ्यासह आज तुरळक तर नरंदे, सावर्डे, कापूरवाडी परिसरात दुपारनंतर समाधान कारक पाऊस झाला. ऊसपिकासह माळरानच्या पिकांसह हा पाऊस पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकण्यासाठी उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गास आजच्या वादळी पावसाने दिलासा मिळाला आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून कुंभोजसह सावर्डे परिसरास वळीव पावसाने सलग हुलकावणी दिल्याने विहिरी तळ गाठू लागल्या होत्या. परिणाणी पिकांना पाण्याचे फेर लांबून लागल्याने माळरानची ऊसपिके वाळू लागली होती. शिवाय उष्म्याने नागरिक हैराण झाले होते.
मोठ्या वळीव पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासह सर्वांचीच आजच्या पावसामुळे वाढलेला असह्य उष्मा कमी होण्यास मदत झाली आहे. शिवाय खोळंबलेल्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान पसरले आहे.