तासगाव/पलूस/सोनी : पलूस, तासगाव, मिरज तालुक्यात आज (गुरुवारी) दुपारी साडेतीनपासून पावसाने हजेरी लावली. तासगाव शहरासह परिसरात आज दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सुमारे तासभर झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणी पाणी झाले. मिरज तालुक्यातील सोनी व परिसरातील अनेक भागात मुसळधार, तर काही भागात हलक्या सरी पडल्या.तुरची फाटा, बांबवडे, सांडगेवाडी, आमणापूर, धनगाव, मोराळे, सावंतपूर, संतगाव आदी भागात जोरदार पाऊस, तर पलूस परिसरात हलक्या सरी पडल्या. या पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान होणार असल्याने बागायतदारांच्या थोड्याफार आशासुध्दा संपुष्टात येऊ लागल्या आहेत. औषध फवारणीनंतर ढगाळ वातावरण, पाऊस, उष्म, दमट हवामान यामुळे पुन्हा बुरशीजन्य रोगांना या पावसाने आमंत्रणच दिले आहे.तासगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेतील उकाडा कमी नव्हता व ढगांचीही दाटी असल्याने पाऊस पडणार, याची दाट शक्यता होती. द्राक्षबागांमध्ये दिवसभर औषधांच्या फवारण्या सुरूच आहेत. त्यात आज दुपारी पुन्हा पावसाने दणका दिला आहे. याने द्राक्षघडांची कूज व घडांची गळ होत असल्याने नुकसानीत आणखीनच भर पडल्याचे शेतकरी सांगत आहेत. (वार्ताहर)
तासगाव, मिरज, पलूस तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस
By admin | Updated: November 13, 2014 23:50 IST