कोल्हापूर : गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या औषधांची विक्री होत असल्याच्या संशयातून फुलेवाडी येथील प्रतीक्षा क्लिनिकवर आरोग्य विभागाने आज, गुरुवारी (दि. १९) छापा टाकून कारवाई केली. संशयित डॉ. डी. बी. पाटील यांच्या जोतिबा डोंगर येथील क्लिनिकचीही कारवाई पथकाकडून सुरू आहे. या कारवाईने पुन्हा एकदा शहरासह जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.देवकर पाणंद येथील डॉ. डी. बी. पाटील यांचे जोतिबा डोंगर येथे क्लिनिक आहे. दीड महिन्यांपूर्वीच त्यांनी फुलेवाडी येथील तिस-या बस स्टॉपजवळ प्रतीक्षा क्लिनिक सुरू केले होते. या क्लिनिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान होत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार खात्री करून पथकाने गुरुवारी सकाळी प्रतीक्षा क्लिनिकमध्ये छापा टाकला. यावेळी क्लिनिकमध्ये काही संशयास्पद औषधे सापडल्याची माहिती पथकातील वैद्यकीय अधिका-यांनी दिली. प्रतीक्षा क्लिनिकमधील कारवाईनंतर पथक जोतिबा डोंगर येथे गेले. तेथील डॉ. पाटील यांच्या क्लिनिकची तपासणी सुरू आहे.गेल्या वर्षी क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील एका घरात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर कारवाई झाली होती. त्यावेळी गर्भलिंग तपासणी करण्यापासून ते गर्भपाताच्या औषधांची विक्री करण्यापर्यंत सक्रीय असलेले रॅकेट करवीर पोलिसांच्या हाती लागले होते. आज झालेल्या कारवाईतूनही मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गर्भलिंग निदान प्रकरणी कोल्हापुरातील एका क्लिनिकवर आरोग्य विभागाचा छापा, डॉक्टर ताब्यात
By उद्धव गोडसे | Updated: December 19, 2024 15:26 IST